मुंबईः मुंबईत धो-धो पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असताना, शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
'पहाटेपासून धुवाधार पाऊस पडतोय. सकाळी तर पाऊस थांबतो की नाही, असं चित्र होतं. काही भागात पाणी साचलं होतं, पण अद्यापही कुठे पाणी तुंबलेलं दिसत नाही', अशी प्रतिक्रिया महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. याचबरोबर, ते म्हणाले, पालिकेनं काम चांगलं केलं आहे, त्यामुळे पाणी साचलं नाही. शहरात ठिकठिकाणी पालिका कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत. वडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. याविषयी विचारले असता, ते म्हणाले, पालिकेच्या अधिका-यांकडून याची माहिती घेतली असून संबंधित बांधकाम अनधिकृत नसल्याचे समजतंय. तसंच, पावसाच्या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी सुदैवाची बाब असल्याचंही महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.
पावसासाठी मुंबई सज्ज असल्याचा दावा महाडेश्वर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, पहिल्याच पावसात त्यांचे दावे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता, काही झालंच नाही असं भासवून आपला बचाव करण्याचा प्रयत्न महापौर करताना दिसताहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरिवली, गोरेगाव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.