रोडवरील अपघात पाहून पालकमंत्र्यांचा ताफा थांबला, जखमींना रुग्णालयात पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:12 PM2020-07-26T14:12:10+5:302020-07-26T14:13:25+5:30
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.
सोलापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर आणि बार्शी दौऱ्यावर आहेत. आपल्या इंदापूर या मूळ गावावरुन सोलापूरकडे त्यांचा ताफा जात असताना वाटेत अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी, तत्काळ तत्परता दाखवत पालकमंत्री भरणे यांनी आपल्या गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही ते भेट देणार असून बार्शीतील शहीद जवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वाघाची वाडी येथे जाणार आहेत. इंदापूर येथून दत्तात्रय भरणे सोलापूरच्या दिशेने निघाले असता, पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी, तत्काळ भरणे यांनी गाडीतून उतरत संबंधित अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच, जखमींना खासगी गाडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. यासंदर्भात संबंधित डॉक्टरांनाही फोनवरुन सूचना दिल्या.
आज सोलापूरला आढावा बैठकीसाठी जात असताना पंढरपूर-मोहोळ रोडला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. जखमींना तातडीने खाजगी वाहनाने उपचारांसाठी दवाखाण्यात पाठवून दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारांसंबंधी सहकार्य करावे यासाठी डाॅक्टरांबरोबर संवाद साधला. pic.twitter.com/7elMaqU17E
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) July 26, 2020
पालकमंत्री भरणे यांच्या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल स्थानिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे.