उच्च राहणीमान पाहून शेतकरीही फसले, मुलीच्या लग्नासाठीचे पैसेही गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 02:38 AM2021-05-07T02:38:18+5:302021-05-07T02:38:55+5:30
मुलीच्या लग्नासाठीचे पैसेही गमावले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च राहणीमान, ऑडीतून ये-जा पाहून शेतकरीही फसले आणि ठकसेन मुकेश सूर्यवंशीच्या जाळ्यात अडकले. यामुळे कुणाचे भविष्यात मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी गुंतवलेले पैसे अडकले तर कुठे वृद्धापकाळासाठी ठेवलेली पुंजी गमावण्याची वेळ आली. सूर्यवंशीमुळे मानसिक तणावाखाली असून, आता न्यायासाठी लढण्याची ताकदही राहिली नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
धुळ्यातील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आणि त्याच्या आई-वडिलांचे उच्च राहणीमान पाहून ते फसवणूक करेल, असे वाटले नव्हते. पाच तोळे सोन्यावर गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट करण्याचे आमिष त्याने दाखवले. सुरुवातीचे तीन महिने गुंतवलेल्या रकमेप्रमाणे हप्ते मिळू लागले. त्यामुळे विश्वास वाढला. एकाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे दुप्पट होतील, तिचे थाटात लग्न करता येईल, या आशेने गुंतवणूक केली. तर सैन्यदलातील एका निवृत्त जवानाने त्याची जमापुंजी गुंतवली. काहींनी कर्ज घेऊन पैसे गुंतवले. त्यानंतर सूर्यवंशी ‘नॉट रिचबेल’ झाला. दुबईला पसार होण्यापूर्वीपर्यंत तो सगळे पैसे मिळणार असल्याचे आश्वासन देत होता. मात्र, नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्याचे आई-वडीलही गायब आहेत. तो रोख पैसे घेत असल्याने पुरावे नाहीत. नातेवाईकांच्या ओळखीतून व्यवहार केल्यामुळे लेखी करारही नाही, असे धुळ्यातील या शेतकऱ्याने सांगितले.
६० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक?
सूर्यवंशीने धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील ६० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या यापैकी २० ते २५ जण संपर्कात आहेत. मात्र, सगळेच मानसिक धक्क्यात आहेत.
कठोर कारवाई व्हावी
सूर्यवंशीविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तक्रारदारांनीही पुढे यायला हवे, त्यामुळे दुसरा सूर्यवंशी तयार हाेऊन काेणाची फसवणूक करणार नाही, असे तक्रारदार सत्यानंद गायतोंडे म्हणाले. कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये एजंट म्हणून कार्यरत असलेल्या गायतोंडे यांच्या प्रयत्नामुळे सूर्यवंशी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.