मतांच्या राजकारणासाठी इंदू मिलची पाहणी, प्रकाश आंबेडकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 06:19 AM2020-01-23T06:19:54+5:302020-01-23T06:20:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची केलेली पाहणी राजकीय खेळी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची केलेली पाहणी राजकीय खेळी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. अनुसूचित जातींच्या मतांवर डोळा ठेवूनच पवारांनी नियोजित स्मारक स्थळाला भेट दिली आहे. मात्र, आंबेडकरी मतदार गळाला लावण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावाही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा मतदार नाही. हाच मतदार गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीने इंदु मिल स्मारकाला गती देण्याची भूमिका घेतली आहे. याच डावाचा भाग म्हणून शरद पवार यांनी मंगळवारी इंदु मिल येथील कामाची पाहणी केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मागासवर्गीय मतदार वंचित आघाडीसोबत आहे. मागील दोन्ही निडणुकांतील आकडेवारी त्याचा पुरावा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला याची कल्पना आहे. मात्र, राष्ट्रवादीचा हा डाव यशस्वी होणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
बंद शांततेत पाळा
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकता नोंदणीच्याविरोधात वंचितने २४ तारखेला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. या बंदला ५० संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे सांगत शांततेत बंद पाळण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. सीएए, एनपीआर कायदा लागू करणारच, ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाषा हुकूमशाही वृत्तीचे द्योतक आहे. सीएए, एनपीआर कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा एक वंशवादी देशाची बनत आहे. त्याचा थेट फटका परदेशस्थ भारतीयांना बसणार असून त्यांच्या जिवीतालाच धोका निर्माण झाल्याचे आंबेडकर म्हणाले.