Join us

Shivsena: "हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 8:11 AM

मुंबईतील दोन दसरा मेळाव्यामुळे शिवसेनेतील फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे

मुंबई - शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. एकीकडे शिवसेना कोणाची हा वाद सुरू असताना आता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. त्यामुळे, शिवसेना विरुद्ध शिंदे आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधीक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यातच, यंदा मुंबईत दसऱ्याचे दोन मेळावे झाले. तेही शिवसेनेच्याच नावाने. त्यावरुनही, शिवसेना आणि शिंदे गटातील दरी उघड झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपला दुश्मन असे संबोधत निशाणा साधला आहे. दुश्मन टाळ्या वाजवतोय, या मथळ्याखाली रोखठोकमधून भाजपवर प्रहार केलाय. तर, शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

मुंबईतील दोन दसरा मेळाव्यामुळे शिवसेनेतील फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे. शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रचंड खर्च झाला. तरीही गर्दी जिवंत होत नव्हती, असे प्रसिद्ध झाले आहे. शिंदे यांनी हा धोका वेळीच ओळखायला हवा, पण राज्यात जे घडत आहे ते पाहून दुश्मन टाळ्या वाजवतोय, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले. त्यांच्या मेळाव्यासही चांगली गर्दी झाली. शिंद्यांचे प्रमुख भाषण झाले ते उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्णपणे चिखलफेक करणारे. शिवतीर्थ विरुद्ध बीकेसी असा हा सामना पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील. महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगले नाही, अशा शब्दात शिसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदेंनी चिंतन केले पाहिजे

भारतीय जनता पक्षाला 30-35 वर्षांत जमले नाही ते श्री. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात करून घेतले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही दसरा मेळावे झाले व दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत त्या एकाच दसरा मेळाव्याचा मोठा वृत्तांत प्रसिद्ध होत असे. मात्र यावेळी पहिल्या पानावर प्रथमच शिवसेना म्हणून दोन दसरा मेळाव्यांच्या गर्दीची छायाचित्रे व बातम्या प्रसिद्ध झाल्या. श्री. शिंदे हे आजही स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार समजत असतील तर त्यांनी या विषयाचे चिंतन केले पाहिजे. शिंदे त्यांच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले, ''मी सत्यासाठी लढतोय. सत्तेसाठी नाही.'' मुळात सत्य असे आहे की, भारतीय जनता पक्ष त्यांचे राजकीय डाव खेळत आहे व शिंदे यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून ठाकऱ्यांच्या विरोधात वापरून घेत आहे.

शिंदेंना याचे भान आहे काय

मोदी-शहांना शिवसेना फोडायची होती. हिंदुत्वाच्या मतांत आणि विचारांत वाटेकरी नको म्हणून शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांना खतम करायचे. शिंदे यांना त्यासाठी वापरले गेले. ईडी कार्यालयात गेल्यावर अनेकांचे हिंदुत्व कसे जागरुक होते, असे एक व्यंगचित्र मध्यंतरी गाजले. शिंदे व त्यांच्या लोकांचे हिंदुत्व त्याच पद्धतीने जागरुक झाले. त्यामुळे बीकेसीवर गर्दी होती, पण उत्साह नव्हता हे समोर आले. तरीही महाराष्ट्राचे राजकारण या सगळ्या प्रकारामुळे चिखलात अडकले. मराठी माणसांची एकजूट तुटत आहे. शिंदे यांच्या पाठीशी आज भाजपचे जे बळ आहे ते शिवसेना फोडण्यासाठी आहे, याचे भान त्यांना आहे काय?

ठाकरे कुटुंब स्टेजवर, कौटुंबिक वाद

शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील काही सदस्य बोलावण्यात आले व 'ठाकरे कुटुंब'देखील आपल्यासोबत असल्याचा आभास निर्माण केला. व्यासपीठावरील त्या प्रत्येक पात्राचा परिचय श्री. शिंदे यांना आहे व त्यामागचे सत्यही ते जाणतात. हा कौटुंबिक विषय आहे. बाळासाहेबांच्या पार्थिवास अग्नी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चंपा थापा व रवी म्हात्रे यांना सर्वात पुढे केले होते. अंत्यसंस्काराचे विधी थापा व म्हात्रे यांच्याकडूनच करून घेतले. याबद्दल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या दिलदारीचे कौतुक झाले. आज 'थापा' शिंदे गटाच्या व्यासपीठावर का गेले? आजही 'मातोश्री'वर निष्ठsने असलेल्या रवी म्हात्रेंकडून शिंदे व त्यांच्या लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. शिंदे यांच्या खुर्चीमागेच 'इव्हेन्ट' व्यवस्थापकाने थापास उभे केले. जणूकाही शिंदे हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. या सर्व ढोंगबाजीचा पर्दाफाश बीकेसीच्या मेळाव्यात झाला व शिंदे यांची झाकली मूठ उघड झाली. भाजपलाही तेच हवे असावे!

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपाएकनाथ शिंदे