आमदार बांगरांना पाहून लग्न मंडपातच घोषणा, ५० खोके-एकदम ओक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:51 PM2023-05-31T13:51:41+5:302023-05-31T14:01:14+5:30
आता, एका लग्नसमारंभासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आले असता, त्यांना ५० खोके, एकदम ओक्के म्हणत डिवचण्यात आलं.
मुंबई/परभणी - शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्यातील मिशन गुवाहटीच्या काळात वादग्रस्त राहिलेले नेते संतोष बांगर हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकांवेळी त्यांनी मिशी काढण्याची भाषा केली होती. त्यावरुन, त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. तर, शिंदे गटाने मिशन गुवाहटी गाठून राज्यात सत्तांतर केल्यानतंर शिदे गटाच्या आमदारांना ५० खोके, एकदम ओक्के म्हणून चिडवण्यात आलं. आता, एका लग्नसमारंभासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आले असता, त्यांना ५० खोके, एकदम ओक्के म्हणत डिवचण्यात आलं.
शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने ५० खोके एकदम ओक्के म्हणून चिडवण्यात येते. शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ५० खोके-एकदम ओके आणि गद्दार म्हणत शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांवर सातत्याने निशाणा साधला. तर, विधानसभेच्या पायरीवरही ५० खोके, एकदम ओक्केचे बोर्ड झळकले होते. त्यामुळे, ५० खोके, एकदम ओक्के ही म्हण गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे. त्यातच, सोमवारी एका लग्नाला गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारासमोरच 50 खोके, एकदम ओक्केची घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी, आमदाराचा चेहरा खजील झाल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी, लग्न मंडपात पहिल्यापासून उपस्थित असलेले परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे बांगर यांनी चरण स्पर्श केला. त्याचवेळी, तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांकडून`पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. शेवटी आमदार बांगर निघून गेले. मात्र, ५० खोके,एकदम ओक्के म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना आजही टार्गेट केलं जातंय, हे पुन्हा एकदा दिसून आलं.