मुंबई- दोन दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीचा मृतदेह गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनवर असलेल्या ट्रेनच्या स्वच्छतागृहात सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका 22 वर्षीय तरूणीला अटक केली आहे. अनिता वाघेला असं तिचं नाव असून ती मृत्यू झालेली मुलगी अंजली सरोज हिच्या वडिलांची प्रेयसी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजलीचे वडील संतोष (वय 28) यांनी अनिताला लग्नाचं वचन दिलं होतं, इतकंच नाही, तर अनिताने दोन वेळा गर्भपातही केल्याचं समोर आलं आहे. याचाच सूड घेण्यासाठी अनिताने अंजलीचं अपहरण करून हत्या केली.
'अंजलीचं अपहरण झाल्याच्या एक तासाने संतोषने अनिताला मेसेज करून अंजलीचं अपहरण केल्याची विचारण केली होती. पण तपास करत असताना संतोषने याबद्दलची माहिती आम्हाला दिली नाही. त्यामुळे त्याने आता त्याचीच मुलगी गमावल्याचं, पोलीस अधिकारी किशोर खैरनार यांनी म्हंटलं. पोलिसांनी अंजलीचा शोध घेण्यासाठी व आरोपीला पकडण्यासाठी एकुण सहा पथक तैनात केली होती. संतोषचं व अनिताचं प्रेमप्रकरण होतं. संतोषच्या पत्नीला या प्रेमप्रकरणाबद्दल फेब्रुवारी महिन्यात समजलं. त्यानंतर संतोषची पत्नी दोन मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातील आजमगड येथे असणाऱ्या घरी निघून गेली. माहेरी जाताना तिने अंजलीला नेल नव्हतं. अंजली संतोषबरोबर घरी राहिली होती. ही संधी साधत संतोषला धडा शिकविण्यासाठी अनिताने अंजलीला मारण्याचा कट रचला.
अनिताने पोलिसांना सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी अंजली जेव्हा इतर चार-पाच मुलांबरोबर बाहेर खेळत होती. तेव्हा मुलांना चॉकलेट देऊन भुरळ घातली. त्यानंतर ती मुलंही बोलायला लागली. त्यानंतर आरोपी महिलेने अंजलीचा हात धरला व तिला घेऊन गेली. तिच्या मागे इतर मुलंही गेली. पण रस्ता क्रॉसिंगच्या वेळी महिलने मुलांना आणखी चॉकलेट आणायला पैसे दिले व अंजलीला घेऊन पुढे गेली.
रस्ता क्रॉसिंगजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी महिला अंजलीचा हात धरून जाताना दिसली होती. सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या महिलेला ओळखत नसल्याचं संतोषने पोलिसांना खोटं सांगितलं होतं. संतोषचं 2011 पासून अनिताबरोबर प्रेमप्रकरण होतं. त्यामुळे तो तिला ओळखू शकत नव्हता हे अशक्यच होतं, असं पोलीस अधिकारी खैरनार म्हणाले.
अनिताने आधी अंजलीसह बोरीवलीला जाणारी ट्रेन पकडली नंतर गुजरातला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये अंजलीला गोळ्या खायला दिल्या ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर अनिता अंजलीला घेऊन नवसारी स्टेशनवर उतरली. तेथे तिचा गळा दाबून हत्या केली व अंजलीचा मृतदेह स्वच्छतागृहात ठेवला.त्यानंतर अनिताने दुसरी ट्रेन पकडून नालासोपारा गाठलं. दरम्यान, अनिता वाघेला हिला अपहरण व हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.