Join us

सेहवाग म्हणाला इतिहास चुकीचा; सचिननेही मराठीत सांगितले 'राजे शिवछत्रपती'...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:06 PM

जुन्नरमधील किल्ले शिवनेरी येथे राज्य सरकारच्यावतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४ वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी साजरी केली जात आहे. जगभर विखुरलेल्या मराठीजनांनी विदेशातही भगवा पताका फडकावत छत्रपती शिवाजी महाराजांना जंयतीनिमित्त अभिवादन केले आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह दिसून येत असून गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवविचारांचा जागर होत असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि शौर्याचा दाखला दिला. तसेच, महाराजांना अभिवादनही केले. 

जुन्नरमधील किल्ले शिवनेरी येथे राज्य सरकारच्यावतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत व मावळ्यांच्या गर्दीत येथे दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियातूनही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत असून सोशल मीडिया आज शिवमय झाल्याचं दिसून येत आहे. मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं एका वाक्यात वर्णन केलंय. महाराजांना अभिवादन करताना, शिवाजी महाराजांसारखा राजा हजार वर्षातून एकदा जन्म घेतो, असे सचिनने म्हटले आहे. ''जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम. मराठी माणसाचा आदर्श असावा असा ह्यांचासारखा राजा हजारो वर्षात एकदा जन्म घेतो.'', असे ट्विट सचिनने केले आहे.  सचिनसह टीम इंडियाचा माजी तडाखेबंद फलंदाज विरेंद्र सेहवागनेही ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. इतिहास आपणास सांगतो की, सामर्थ्यवान लोकं हे सामर्थ्यशाली ठिकाणातून येत असतात. पण, हा इतिहास चुकीचा आहे. सामर्थ्यवान लोकं त्या ठिकाणांना सामर्थ्यवान बनवतात, असे ट्विट सेहवागने केले आहे. सेहवागने एका वाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा महिमा सांगितला आहे. 

मोदींकडूनही अभिवादन, व्हिडिओ शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  

टॅग्स :सचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागशिवजयंतीनरेंद्र मोदी