अटक टोळीकडून १९ लाखांचा ऐवज जप्त
By admin | Published: August 1, 2014 03:41 AM2014-08-01T03:41:37+5:302014-08-01T03:41:37+5:30
घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या टोळीकडून वाशी पोलिसांनी १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या टोळीकडून वाशी पोलिसांनी १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी भरदिवसा घरफोडी करण्यात सराईत असून त्यांनी वाशी विभागात १५ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीचा प्रमुख असलेला अस्लम शेख हा प्रत्येक वेळी साथीदार बदलून गुन्हे करत असे.
वाशी सेक्टर १५ येथे भरदिवसा घरफोडीची घटना २३ जुलै रोजी घडली होती. यावेळी सोसायटीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे २५ जुलै रोजी पोलिसांनी तिघांच्या टोळीला अटक केली आहे. अस्लम इस्माईल शेख (३६), सोनाली जातक (१९) आणि महम्मद अख्तार जिद्राईल खान अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून अधिक तपासात सुमारे १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ५० तोळे सोने व अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले. या टोळीचा प्रमुख अस्लम शेख हा दिवसा चोरी करण्यात सराईत आहे. त्यानुसार वाशी विभागात त्याने केलेल्या १५ गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे देखील मस्के यांनी सांगितले. गेली तीन वर्षे तो दिवसा घरफोडीचे गुन्हे करत असून पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला आहे. तर गुन्हे करताना प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या टॅक्सी व महिलेचा आधार घ्यायचा.
तो इमारतींमध्ये महिलेसोबत सेल्समन बनून जायचा. तेथे बंद घर आढळल्यास महिलेकडील पर्समध्ये लपवलेल्या हत्याराने कुलूप तोडून घरफोडी करायचे. अशाचप्रकारे वाशी येथे घरफोडी करताना त्याने सोनाली जातक हिची मदत घेतली होती. सोनाली हिचे मयत वडील देखील गुन्हेगार होते. त्यामुळे अस्लम याची त्यांच्यासोबत ओळख होती. परंतु काही महिन्यांपूर्वी या दोघांनीच त्यांची हत्या केल्याचाही पोलिसांचा संशय आहे. मात्र यासंदर्भातची अधिक माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही. अस्लम हा एकटाच घरफोडीचा प्लॅन तयार करायचा. तर कोणतेही पुरावे मागे न सोडता तो भरदिवसा घरफोड्या करुन पसार व्हायचा. त्यामुळेच अद्यापपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर वाशी पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली आहे.
अस्लम याने नवी मुंबईसह मुंबई व इतर ठिकाणीही अशाच प्रकारे घरफोड्या केल्या असल्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने अधिक तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)