आणखी एक मर्सिडीज सापडली; ऑडी, इकोचा शोध सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक मर्सिडीज एनआयएच्या पथकाने शनिवारी जप्त केली. आतापर्यंत त्याच्या एकूण आठ गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र मनसुख हिरेन यांच्या हत्येशी संबंधित ऑडी व इको कारचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्याच्यासह अन्य गाड्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महागड्या कारचा शौकीन असलेल्या वाझेकडे विविध कारचा ताफा होता. त्यापैकी अनेक इतरांच्या नावावर असून तो त्याचा वापर सोयीनुसार करत होता. एनआयएने ३ मर्सिडीज, २ इनोव्हा, स्काॅर्पिओ, आऊट लँडर अशा एकूण आठ गाड्या जप्त केल्या. पांढऱ्या रंगाची मर्सिडीज शनिवारी जप्त केली.
वाझे हा निलंबित पाेलीस कर्मचारी विनायक शिंदेसमवेत ३ मार्चला ऑडी कारमधून प्रवास करीत असलेलेले फुटेज वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावरील मिळाले होते. ती गाडी मात्र अद्याप सापडलेली नाही. शिंदे ती चालवित होता, तर वाझे त्याच्या बाजूला बसला होता. त्या गाडीत ठाण्याचे उद्याेगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. अन्य गाड्याही शोधण्यात येत आहेत.
-------------