खाद्यतेलाचा कोटींचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:49 AM2022-08-13T11:49:34+5:302022-08-13T11:50:01+5:30
राज्यातील खाद्यतेल सर्वेक्षण मोहिमेमध्ये २७० नमुने घेण्यात आले, त्यात खाद्यतेलाचे नमुने २५०, वनस्पती ९, एमएसईओचे ११ नमुने आहेत.
मुंबई : नाशिकमधून अन्न व औषध प्रशासन विभागाने एक कोटींहून अधिक रकमेचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.नाशिकमधील शिंदे गाव येथे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर, अविनाश दाभाडे यांनी विशेष मोहिमेंतर्गत मेसर्स मे. माधुरी रिफायनर्स प्रायव्हेट लिमिटेड, नायगाव रोड येथे धाड टाकली.
यावेळी आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्यतेलांचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत एक कोटी दहा लाख ११ हजार २८० रुपये जप्त केला. नागपूर विभागात खाद्यतेलाचे ३० व एमएसईओचे २ असे एकूण ३२ सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. राज्यातील खाद्यतेल सर्वेक्षण मोहिमेमध्ये २७० नमुने घेण्यात आले, त्यात खाद्यतेलाचे नमुने २५०, वनस्पती ९, एमएसईओचे ११ नमुने आहेत.