साळगावकर कुटुंबाच्या ४४१ मालमत्तांची जप्ती; ४९० कोटींचा कर चुकवला, ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:49 AM2023-08-10T07:49:20+5:302023-08-10T07:49:34+5:30
आयकर विभागानेही या कुटुंबाची चौकशी केली करून ४९० कोटी रुपयांचा करभरणा करण्याची नोटीस त्यांना जारी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोव्यासह मुंबई व कर्नाटक येथील एक प्रमुख व्यावसायिक अनिल साळगावकर (आता मृत) यांच्या एकूण ४४१ स्थावर मालमत्ता व शेअर्सच्या जप्तीचे आदेश ईडीने मंगळवारी जारी केले. या मालमत्ता प्रामुख्याने गोवा, मुंबई व कर्नाटक येथे आहेत. मध्यंतरी पॅन्डोरा पेपर्सच्या माध्यमातून भारतीयांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीची व त्यात झालेल्या कर चुकवेगिरीची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये साळगावकर यांचे नाव आले होते.
उपलब्ध माहितीनुसार, साळगावकर यांचे हे प्रकरण परदेशी चलन विनिमय कायद्याशी संबंधित असून, त्यांनी तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या परदेशी चलनाशी निगडीत नियमांचा भंग केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. अनिल साळगावकर यांच्या निधनानंतर आता याप्रकरणी साळगावकर यांची पत्नी व चार मुले ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आली आहेत.
आयकर विभागानेही या कुटुंबाची चौकशी केली करून ४९० कोटी रुपयांचा करभरणा करण्याची नोटीस त्यांना जारी केली होती. २०२१पासून आतापर्यंत आयकर विभागाने त्यांना पाच वेळा नोटीस जारी करत बोलावले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद तपास यंत्रणांना मिळाला नसल्याचे समजते. साळगावकर यांचे कुटुंबीय सिंगापूर येथे वास्तव्यास असल्याचे समजते.