Join us

अनिल जयसिंघानी याच्या शिर्डीतील हॉटेलची जप्ती; आयपीएल सट्टा प्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:10 AM

या सट्टेबाजीच्या प्रकरणानंतर जयसिंघानी सुमारे आठ वर्षे गायब होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सन २०१५ साली आयपीएल सामन्यांदरम्यान झालेल्या २,६०० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी प्रकरणात उजेडात आलेला कथित बुकी अनिल जयसिंघानी याचे शिर्डी येथील हॉटेल ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सोमवारी जप्त केले. शिर्डी येथील हॉटेलचा भूखंड जयसिंघानी याने दोन कोटी रुपयांना विकत घेतला होता आणि तो व्यवहार सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांतून केल्याचा ठपका ईडीने ठेवला असून सट्टेबाजीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून हे हॉटेल जप्त करण्यात आले आहे. 

या सट्टेबाजीच्या प्रकरणानंतर जयसिंघानी सुमारे आठ वर्षे गायब होता. मार्च महिन्यात अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ईडीचे अधिकारीदेखील आता सट्टेबाजी प्रकरणी तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आयपीएल सामन्यांत झालेल्या सट्टेबाजीप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी परेश आणि मारुती अहमदाबाद या दोन बुकींना अटक केली होती. त्यांनी सर्वप्रथम जयसिंघानी याचे नाव ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच त्यांनी व अन्य काही बुकींनी अनिल जयसिंघानी याला कमिशन दिल्याचे त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्याचा शोध घेत होते. हे प्रकरण ईडीचे अहमदाबाद येथील तत्कालीन विभागीय संचालक जे. पी. सिंग यांनी उघडकीस आणले होते.

प्राथमिक चौकशीत १०० कोटींची मालमत्ता आढळली 

जयसिंघानीची मालमत्ता १०० कोटींची असल्याचे ईडीच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. यामध्ये हॉटेल्स, फ्लॅट्स, दुकाने, भूखंड आणि अन्य काही स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचे समजते. जयसिंघानी याच्या कुटुंबीयांच्या तसेच निकटवर्तीयांच्या बँक खात्यातदेखील कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. या संदर्भात ९ मे रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल जयसिंघानी याच्या उल्हासनगर येथील घरी व मुंबईतील संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती.

 

टॅग्स :आयपीएल २०२३क्रिकेट सट्टेबाजीअंमलबजावणी संचालनालय