Join us

शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र जप्त; मालमत्ता कर थकबाकी असल्याने कारवाई

By जयंत होवाळ | Published: May 08, 2024 8:52 PM

‘पी उत्तर’ विभागातील मालाड येथील कला विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीकडे ०३ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.

मुंबई : सातत्याने आवाहन करून तसेच वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर महानगरपालिकेच्यावतीने जप्तीची कारवाई करण्यात आली. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील कला विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र, ‘एफ दक्षिण’ विभागातील न्यू नॅशनल मार्केटचे दोन व्यावसायिक गाळे आणि ‘एस’ विभागातील चारभुजा मार्बल आर्ट या दुकानाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ४ कोटी १३ लाख ८८ हजार ५७७ रुपयांची कर थकबाकी आहे.

‘पी उत्तर’ विभागातील मालाड येथील कला विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीकडे ०३ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे पी उत्तर विभागाच्या चमूने या शैक्षणिक संस्थेतील संगणक केंद्र जप्त केले. ‘एफ दक्षिण’ विभागातील रफी अहमद किडवाई मार्गावरील न्यू नॅशनल मार्केटकडे ५९ लाख ८८ हजार ५७० रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे या मार्केटमधील दोन व्यावसायिक गाळ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ‘एस’ विभागामधील पवईस्थित चारभुजा मार्बल आर्ट या मालमत्तेचा २६ लाख रुपये कर थकीत आहे. 

या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालाची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मंगळवारी ‘जी उत्तर’ विभागातील तीन भूखंड आणि ‘पी उत्तर’ विभागातील एका व्यावसायिक गाळ्यावर कारवाई करण्यात आली होती. या चारही मालमत्ताधारकांकडे एकूण १० कोटी १३ लाख २२ हजार ९१२ हजार रुपयांची कर थकबाकी आहे. कारवाईची प्रक्रिया सुरू करताच एका गाळाधारकाने ४९ लाख रुपयांचा तत्काळ मालमत्ता करभरणा केला होता.

टॅग्स :मुंबई