रोजगारनिर्मितीसाठी २७ तालुक्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:52 AM2018-02-01T04:52:58+5:302018-02-01T04:53:26+5:30
राज्यातील दारिद्र्य निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने देशातील पहिली अॅक्शन रूम मंत्रालयात स्थापन केली असून पहिल्या टप्प्यात २७ तालुके रोजगार-युक्त केले जातील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील दारिद्र्य निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने देशातील पहिली अॅक्शन रूम मंत्रालयात स्थापन केली असून पहिल्या टप्प्यात २७ तालुके रोजगार-युक्त केले जातील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील व वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अॅक्शन रूम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील २७ पैकी १९ तालुके आदिवासीबहुल असून या तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अॅक्शन रूमच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार आहे.
तर कृषी आणि कृषी प्रक्रिया, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग, कुक्कूटपालन मांस आणि अंडी, मत्स्यव्यवसाय-पॅकेज, प्रक्रिया, उत्पादन, शेळी पालन-कच्चे मांस प्रक्रिया, बांबू उत्पादने आणि हस्तकौशल्याच्या वस्तू, वनाधारित उत्पादनांची प्रक्रिया, पॅकेजिंग, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा विकास, पर्यटन यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
या तालुक्यांचा समावेश
अक्कलकुवा, अक्राणी, जामनेर, मुक्ताईनगर, परतूर, भोकरदन, हिंगोली, औंढा नागनाथ, जळगाव (जामोद), पातूर, चिखलदरा, धारणी, उमरखेड, कळंब, काटोल, रामटेक, तुमसर, लाखनी, सालेकसा, देवरी, जिवती, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, मूल, नागभीड, चामोर्शी, आरमोरी हे तालुके पहिल्या टप्प्यात रोजगारयुक्त करण्यात येणार आहेत.