फडणवीसांच्या काळातच 'त्या' कंपनीची निवड, टोपेंनी सांगितली परीक्षेची नवीन तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:27 AM2021-09-27T09:27:57+5:302021-09-27T09:29:06+5:30
राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. त्यानंतर, आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, या कंपन्यांची निवड फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. त्यानंतर, आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्य विभागाच्या ६ हजार २०५ पदांच्या पुढे ढकलण्या आलेल्या लेखी परीक्षा १५, १६ किंवा २२, २३ ऑक्टोबर रोजी घेतल्या जातील. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाच्या बैठकीत तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी रविवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
या संदर्भात आरोग्य विभाग व न्यासाचे प्रमुख यांची बैठक होणार आहे. त्यात पुढील तारखा ठरवल्या जाणार आहेत. पाच-दहा दिवस जास्त लागले तरी चालेल परंतु, सर्व दक्षतांचा खात्री करून पुढील तारखांचा निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारी रेल्वेची परीक्षा पुढे ढकलल्यास आरोग्य विभागाची परीक्षा १५, १६ ही तारीख घेता येईल. नाहीतर २२ व २३ ऑक्टोबर ही तारीख असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस सरकारने केली होती निवड
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांच्या अधिपत्याखालील आयटी विभागाने फडणवीस सरकारच्या काळातच या परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड केलेली आहे. न्यासा कंपनी आरोग्य विभागाने निवडलेली नसून परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे इतकीच जबाबदारी आरोग्य विभागाची होती, असे टोपे यांनी स्पष्ट केले.