Join us

चेंबूरमध्ये पोटनिवडणुकीची चुरस

By admin | Published: December 23, 2015 12:49 AM

काँग्रेसच्या नगरसेवकाने पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १४७ मध्ये अनेक महिन्यांपासून नगरसेवक पद रिकामे होते

मुंबई : काँग्रेसच्या नगरसेवकाने पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १४७ मध्ये अनेक महिन्यांपासून नगरसेवक पद रिकामे होते. त्यामुळे येत्या १० जानेवारीला येथे पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. शिवसेनेच्या वतीने अनिल पाटणकर यांना तर काँग्रेसमधून राजेंद्र नगराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सात अपक्षांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १४७ मध्ये पूर्वी अनिल पाटणकर हे काँग्रेसचे नगरसेवक होते. मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांनी नगरसेवकपद आणि पक्षाचा देखील राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने याठिकाणी अनिल पाटणकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून राजेंद्र नगराळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या दोन्ही पक्षांतील उमेदवारांसह एकूण ९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात सेनेकडेच नगरसेवकपद होते. त्यामुळे पुन्हा एकदा ही जागा सेनेच्याच पारड्यात यावी, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पाटणकर यांच्यासोबत पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित होते. शिवाय चेंबूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. तर काँग्रेस उमेदवार राजेंद्र नगराळे यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासह खारदेव नगर आणि घाटला गावातील रहिवासी मोठ्या संख्येने आले होते. यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. (प्रतिनिधी)