मुंबईतील नऊ प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:50 AM2019-12-25T05:50:25+5:302019-12-25T05:50:42+5:30
परंपरागत घरगुती आरोग्यपेयांच्या निर्मितीचा प्रकल्प ठरला महाराष्ट्रात लहान गटांत अव्वल
मुंबई : शीतपेयांचे फॅड लहान मुलांमध्येच नाही, तर मोठ्या माणसांमध्येही पाहायला मिळते. मात्र बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या शीतपेयांचे आरोग्यावर दुष्परिणामच जास्त दिसून येतात. यावर उपाय म्हणून मुलुंड पूर्वच्या जे. जे. अॅकॅडमीच्या योहानने सादर केलेला प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. जे. जे. अॅकॅडमीच्या ‘परंपरागत घरगुती आरोग्यपेयांची निर्मिती’ या प्रकल्पाने महाराष्ट्रात लहान गटामधून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे देशातील वैज्ञानिक क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेस या शास्त्रज्ञांच्या परिषदेसाठीदेखील हा प्रकल्प पाठविला जाणार आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाºया राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेत या वर्षी मुंबई जिल्ह्याला विक्रमी यश मिळाले. पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथील समर्थ इंजिनीअरिंग महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या या राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेत मुंबईच्या ९ प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. या वर्षीची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषद केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे २७ ते ३१ डिसेंबरला होईल. परिषदेस मुंबईच्या निवडप्राप्त ९ शाळांचे प्रकल्पक विद्यार्थी महाराष्ट्राच्या ३० बालवैज्ञानिकांच्या चमूसह २६ डिसेंबरला केरळला रवाना होतील.
९ प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड म्हणजे २० वर्षांतील राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा हा मुंबईचा उच्चांक आहे. मागील पाच वर्षांत मुंबईतून ३१ विज्ञान प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले गेले. त्यामुळे मुंबई व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची गुणवत्ता असे एक समीकरण तयार झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या या उपक्रमाचे मुंबई विभाग प्रमुख बी. बी. जाधव यांनी दिली. या यशात मुंबईतील मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, बाल संशोधक विद्यार्थी, मुंबई शिक्षण विभाग, या उपक्रमाची मुंबईतील समन्वयक संस्था नवनिर्माण विज्ञान प्रबोधन यांची गेल्या २० वर्षांतील मेहनत असल्याचेही त्यांनी म्हटले.
संपूर्ण राज्यातून ८४ प्रकल्पांची निवड
या वर्षी या स्पर्धेसाठी मुंबईतील ३०१ विज्ञान प्रकल्प जिल्हास्तरावर सहभागी झाले होते. त्या प्रकल्पांचे सादरीकरण आणि परीक्षण माटुंगा येथील श्री अमूलख अमीचंद हायस्कूल या शाळेत आयोजित जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषदेत केले होते. त्यापैकी २० प्रकल्पांची निवड राज्यपूर्व चाळणी स्तरासाठी झाली आणि १३ प्रकल्प बेल्हे येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले. राज्यस्तरावर संपूर्ण राज्यातून ८४ प्रकल्प निवडले गेले. यातून राष्ट्रीय स्तरासाठी ३० प्रकल्पांची निवड झाली आहे. त्यात मुंबईचे ९ प्रकल्प आहेत.