'इफ्फी'तील फिल्म बाजारसाठी ४ मराठी चित्रपटांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 12:22 PM2024-10-11T12:22:51+5:302024-10-11T12:23:06+5:30
आत्मपॅम्प्लेट', 'तेरवं', 'विषय हार्ड', 'छबिला' दाखविणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) फिल्म बाजार विभागासाठी राज्य सरकारने 'आत्मपॅम्प्लेट', 'तेरवं', 'विषय हार्ड', 'छबिला' या चार मराठी चित्रपटांची निवड केली आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे उपस्थित होत्या.
मराठी चित्रपटाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने २०१५ पासून सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरिता मृण्मयी देशपांडे, निपुण धर्माधिकरी, महेश लिमये, अमितराज सावंत, मीना कर्णिक या पाच परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती.
परीक्षकांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार 'आत्मपॅम्प्लेट', 'तेरवं', 'विषय हार्ड', 'छबिला' या चार मराठी चित्रपटांची निवड केली आहे.
चित्रपटाच्या प्रतिनिधींचाही सहभाग
चारही चित्रपटांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी सरकारतर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरिता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे.
पणजी येथे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार असून, येथे सरकारचा आकर्षक स्टॉल उभारण्यात येणार आहे. तसेच चारही चित्रपटांचा खेळही दाखविण्यात येणार आहे.