विशेष रुग्णालयासाठी मुलुंड पूर्व येथील जागेची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 02:01 AM2020-10-04T02:01:41+5:302020-10-04T02:02:04+5:30
२१ एकर जागेवर पाच हजार खाटांचे रुग्णालय
मुंबई : साथीच्या आजारांवर उपचार करणारे पाच हजार खाटांचे विशेष रुग्णालय बांधण्यासाठी महापालिकेने अखेर मुलुंड, पूर्व द्रुतगती महामार्गावरील २२ एकर जागेची निवड केली आहे. ही जागा खासगी मालकीची असल्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जागेची मोजणी करून किंमत निश्चित केल्यानंतर ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
साथीच्या आजारांसाठी मुंबईत महापालिकेचे १२५ खाटांचे कस्तुरबा रुग्णालय आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर अशा विशेष रुग्णालयाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. रुग्णांची संख्या एप्रिल-मे महिन्यात वाढत गेल्यामुळे खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे तात्पुरती जम्बो फॅसिलिटी सेंटर तत्काळ उभारण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असे विशेष रुग्णालय बांधण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात आला. मात्र केवळ मुंबईचे नव्हे तर ठाणे, रायगड, पालघर येथील गरजूंना उपचार मिळावा, यासाठी द्र्रुतगती महामार्गावर जागेचा शोध सुरू होता. त्यानुसार अनेक प्रयत्नांनंतर मुलुंड आणि भांडुप अशा दोन जागांचा पर्याय पालिकेला मिळाला. यापैकी कोणती जागा या विशेष रुग्णालयासाठी उत्तम ठरेल, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाहणी करून मुलुंड पूर्व येथील २१.७० एकर जागा निश्चित केली आहे.
जागा निश्चित करण्यासाठी स्थापन दहा सदस्य समितीमध्ये जमीन हस्तांतरण, विकास नियोजन, आरोग्य खाते, वास्तुविशारद, विधी आणि वित्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या जागेवर कायमस्वरूपी पाच हजार खाटांचे रुग्णालय बांधायचे अथवा तूर्तास केंद्र बांधून आवश्यकतेनुसार त्याचे रूपांतर फिल्ड रुग्णालयात करण्याबाबत विचार सुरू आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व रुग्णांना या रुग्णालयात उपचार मिळणार असल्याने राज्य सरकार आणि महापालिका यांच्यामार्फत या प्रकल्पासाठी निधी उभारला जाणार आहे.