स्वयंसमृद्ध भारत इतरांनाही समृद्ध करू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:48 AM2017-08-14T05:48:03+5:302017-08-14T05:48:03+5:30
भारत हे एक स्वयं समृद्ध राष्ट्र आहे. हे राष्ट्र प्रगती करीत असताना इतरानांही बरोबर घेत आहे.
मुंबई : भारत हे एक स्वयं समृद्ध राष्ट्र आहे. हे राष्ट्र प्रगती करीत असताना इतरानांही बरोबर घेत आहे. इतर देशांनाही समृद्ध करण्याची भारताकडे क्षमता आहे, असे प्रतिपादन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.
‘अहिंसा विश्व भारती’ या संस्थेतर्फे रविवारी वरळी येथील ‘एनएससीआय’ येथील डोममध्ये ‘जागतिक शांतता परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘विविधतेत एकता - भारतीय संस्कृती’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दलाई लामा बोलत होते. या वेळी योगगुरू बाबा रामदेव, अहिंसा विश्व भारती या संस्थेचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, जैन आचार्य कुलचंद्र विजय महाराज, नम्रमुनी महाराज, अकाल तख्तचे प्रमुख जत्थेदार ग्यानी गुरबचन सिंग, आॅल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डचे उपाध्यक्ष डॉ. कल्बे सादिक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांच्यासह केंद्रीय मंत्री महेश शर्मा, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आदी मान्यवर उपस्थित होते.
दलाई लामा म्हणाले की, ‘बौद्ध धर्म हा भारत आणि चीन या दोन्ही राष्टÑांना जोडतो. मानवाच्या कल्याणासाठी या दोन्ही शक्तिशाली राष्टÑांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जगभरात अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर हिंसा आणि दहशतवाद करणे अत्यंत दु:खदायक आहे. धर्माच्या नावावर लोकांमध्ये जी तेढ निर्माण केली जात आहे, त्यावर धर्मगुरूंनी लोकांशी आणि इतर धर्मगुरूंशी बोलून तोडगा काढायला हवा.’
दलाई लामा यांनी मंचावर उपस्थित विविध धर्मांच्या प्रतिनिधींना व जगभरातील धर्मगुरूंना आवाहन केले की, धार्मिक कट्टरपंथी लोकांशी आणि शक्य झाल्यास आतंकवादी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलून, दहशतवादापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. या प्रक्रियेमध्ये शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल. विज्ञान आणि आध्यात्म यांच्यात समन्वय होत आहे, हे कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
बाबा रामदेव म्हणाले की, विविधतेत एकता ही भारताची विशेषता आहे. सर्वधर्म समभाव हा येथील मूलमंत्र आहे. अहिंसा, शांती आणि सद्भावनेचा उगम भारतातूनच झाला आहे. योग ही भारतीय एकतेची ताकद आहे. धर्मगुरू, नेते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन, विश्वशांतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले की, सध्या जगाची परिस्थिती पाहता, अशा प्रकारची विश्वशांती परिषद भरविणे गरजेचे आहे. सध्या फक्त भारतातच नव्हे, तर चीन व अमेरिकेसह अनेक युरोपीयन देशही दहशतवादाच्या छायेखाली आहेत. अशा वेळी विविध धर्मांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. कारण हिंसा आणि युद्ध हे दहशतवादावरील उपाय नाहीत. हिंसा प्रतिहिंसेला जन्म देते. विविध धर्माच्या लोकांमध्ये, धर्मगुरूंमध्ये सवांद झाला, तर अशा समस्यांवर उपाय नक्कीच मिळतील.
>लामा-बाबांची मस्ती
विश्व शांती परिषदेत तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा जेव्हा मंचावर बोलण्यास उभे राहिले, तेव्हा त्यांनी बाबा रामदेव यांना जवळ बोलावून घेत, त्यांच्या दाढीला हात लावत गंमत केली. त्यानंतर, लगेचच बाबा रामदेव यांनी लामांसह उपस्थितांना पोटाचे स्नायू हलवून ‘नौली’ ही क्रिया करून दाखविली. त्यानंतर, उपस्थितांनी टाळ््यांचा कडकडाट केला.