पेन्शनसाठी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:30 PM2023-06-11T12:30:23+5:302023-06-11T12:30:36+5:30
त्यांनी बॅगेतून बाटली काढून अंगावर रॉकेल ओतून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पेन्शनसाठी प्रदीप दत्ताराम शिंदे या ६८ वर्षीय कर्मचाऱ्याने पालिकेच्या शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी या विभागाच्या सहायक संचालक (अतांत्रिक) पदावर कार्यरत असलेल्या सुमन गमरे यांच्या फिर्यादीवरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गमरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिंदे हे शिल्पनिदेशक आयटीआय या पदावर १९८५ पासून रुजू झाले. त्यांच्यावर अंधेरी आयटीआय येथे कार्यरत असताना अखिल भारतीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा नापास झालेल्या दोन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन त्यांना पास झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. शासनाची व एल. ॲण्ड टी कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक झाली होती. त्यानंतर ते जामिनावर मुक्त झाले. विभागीय चौकशीच्या अंती २००३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, २०१९ मध्ये साकीनाकामध्ये दाखल गुन्ह्यात निर्दोष मुक्तताही झाली.
पुढे शिंदे यांना आयटीआय, रत्नागिरी या कार्यालयाकडुन सेवानिवृत्त उपदान, गटविमा रक्कम, भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण रक्कम देण्यात आली. सहसंचालक प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी शिंदे यांना सक्तीने सेवानिवृत्तनंतरचे निवृत्त वेतनाबाबत गमरे यांच्याकडे अधिक माहिती मागितली. त्यानुसार त्यांनी २२ मे रोजी अहवाल सादर केला.
शुक्रवारी सकाळी १० वाजता पालिकेच्या शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय कार्यालयात ते आले. तेथे गमरे यांच्याकडे माझ्या पेन्शनचे काय झाले? होणार आहे की नाही? मला आताच निर्णय द्या म्हणत आरडाओरडा सुरू केला. पुढे त्यांनी बॅगेतून बाटली काढून अंगावर रॉकेल ओतून घेतले.