- मनीषा म्हात्रेवयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले जळगावचे सुपुत्र मुरलीधर जाधव यांनी गेल्या एका तपामध्ये पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले. त्यांच्या या आतापर्यंतच्या प्रवासाला मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून गौरविण्यात आले. गेल्या वर्षी जर्मन देशानेही त्यांच्यावर चित्रफित बनवली होती. सध्या ते पोलीस शिपाई म्हणून कुर्ला पोलीस ठाणे येथे नियुक्तीस असून मध्य नियंत्रण कक्ष येथे प्रतिनियुक्तीस आहेत. सपार्बाबत असलेली अंधश्रद्धा त्यात स्वयंघोषित सर्प मित्रांमुळे नागरिकांची लूट होत असल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या या प्रवासाबाबत केलेली ही बातचीत...
सर्प पकडण्याची आवड कशी निर्माण झाली ?जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लाहोरा या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतात कामासाठी जात होतो. आठव्या वर्षी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. सर्पदंशाचा उपचारासाठी कुटुंबियांनी अंधश्रद्धेतून गावातील मांत्रिकाकडे धाव घेतली. मांत्रिकाच्या भोंदूगिरीने फरक न पडल्याने तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तोपर्यंत शरीरभर विषाचा प्रभाव पसरला होता. अशात चाळीसगावचे सर्पमित्र राजेश ठोंबरे धावून आले. ठोंबरे यांनी जळगावहून विषविरोधी औषध मागवून प्राण वाचविले. आणि तेव्हापासूनच सापांबाबत विचार करायला लागलो. ठोंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. जागृतीच्या अभावामुळे साप चावलेल्या व्यक्तीला कुठलेही उपचार मिळत नसल्याने त्यासाठी काम करण्याचा चंग बांधला. त्यानंतर १३व्या वर्षांपासून साप पकडून त्याची मुक्तता करण्याचे, तसेच वनविभागाच्या मदतीने त्याला जंगलात सोडून देण्याच्या कामाला सुरुवात केली.
घरच्यांचे सहकार्य कसे आहे ?सुरुवातीला आई वडीलांनी विरोध केला. मुलगा साप पकडत फिरतो. उद्या त्याला तोच सर्प मारेल, असा घरच्यांचा समज होता. पण सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या मोठा भाऊ राजेंद्र यांनी कुटूंबियांची समजूत काढली. त्यानंतर घरच्यांनी पाठिंबा दिला. पुढे जोडीदारची निवड करतानाही ज्या मुलीला सर्पांबाबत माहिती असेन अशाच मुलीसोबत लग्न करण्याची अट घातली होती. त्यातूनच शेतकरी कुटूंबातील दहावी शिकलेल्या मुलीशी लग्न केले. रात्री अपरात्री सर्पांबाबत फोन येताच मी तसाच बाहेर पडतो. ती नेहमीच मला सहकार्य करते.‘खांदेश रत्न २०१९’या पुरस्काराबाबत काय सांगाल..शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला असताना २०१४ मध्ये वांद्रे-कलानगर येथील ‘मातोश्री’ बंगल्याच्या शेजारील बंगल्यात अजगर शिरला होता. त्याला बाहेर काढण्याची जोखीम मी उचलली आणि त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेनंतर मी पहिल्यादा प्रकाशझोतात आलो. ‘खांदेश रत्न २०१९’ पुरस्कार मिळत असल्याने खूप आनंद होत आहे.नागरिकांचा फोन येतो तेव्हा कसे वाटते?स्टेशनमध्ये पोलिसांच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर सातत्याने सापांबाबत कॉल येतात. एखाद्या वस्तीमध्ये अथवा घरात साप आढळल्यानंतर धास्तावलेले नागरिक पोलिसांना फोन करत, त्यावेळी हे कॉल घ्यायला सुरुवात केली. पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच पालिका, अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षातही माझा क्रमांक दिलेला आहे. एखाद्या वस्तीत, सोसायट्या किंवा फ्लॅटमध्ये साप असल्यास रहिवाशांची भंबेरी उडते, अशावेळी सर्पमित्रांचा संपर्क नसल्यास नागरिक पोलिसांनाच फोन करतात.
पोलीस दलात कसे आलात?मला खर तर वनविभागात जायचे होते. अपघाताने घरच्याच्या आग्रहाखातर मी, काकाचा मुलगा आणि गावातून ५४ जण पोलीस भरतीत सहभागी झालो. त्यात निवड होताच २००७मध्ये पोलीस हवालदार म्हणून रुजू झालो.