आत्मसाक्षात्कार... पोलिसाचा नोकरीचा त्याग, पुढील आयुष्य अध्यात्मात व्यतीत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:05 AM2023-07-19T09:05:48+5:302023-07-19T09:06:22+5:30
पोलिस नाईकपदाचा दिला राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उर्वरित आयुष्य अध्यात्मामध्ये घालवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला आहे. राणाप्रताप तायडे असे त्यांचे नाव असून ते सागरी सुरक्षा शाखेत पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहेत. ते नोकरी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे.
एकीकडे पोलिस भरतीसाठी इच्छुकांच्या रांगा लागत असतानाच, दुसरीकडे हातात असलेली नोकरी केवळ अध्यात्मासाठी सोडण्याचा निर्णय तायडे यांनी घेतला आहे. त्यांना आत्मसाक्षात्कार, मोक्ष व जनकल्याण यासाठी पुढील जीवन घालवण्याची इच्छा झाली आहे. यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांचा राजीनामा सोपवला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी संन्यास घेण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु, कुटुंबाने त्यांचे मनपरिवर्तन केल्यानंतर त्यांनी तो निर्णय टाळला होता. मात्र, यावेळी त्यांनी कुटुंबाचेही मन वळवून नोकरीचा त्याग केला आहे. त्यांना पोलिस दलात नोकरीला लागण्याच्या अगोदरपासून अध्यात्माची ओढ होती, असे समजते. त्यामुळे पोलिस दलात त्यांचे मन लागत नसल्याने ते संन्यास घेऊ इच्छित होते. त्यांच्या या निर्णयाने चकित झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांची विचारपूस करून त्यांना नोकरी न सोडण्याचाही सल्ला दिला. मात्र, आपली मनाची पक्की तयारी झाली असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सांगितले. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. राणाप्रताप तायडे यांच्या या निर्णयाची पोलिस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.