Join us

बोरिवलीत आरबीआय कर्मचाऱ्यांचा स्वयं पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण

By मनोहर कुंभेजकर | Published: March 31, 2024 4:22 PM

प्रथम "सेल्फ रीडेवलप्पड आरबीआय एम्प्लॉइज जयदत्त सोसायटी, बोरिवली" ची स्थापना केली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे फुकट गेली तरी सर्व सभासदांनी जिद्द सोडली नाही.

मुंबई - बोरिवली पश्चिम येथील कस्तुर पार्क परिसरात आरबीआय कर्मचाऱ्यांची तीन मजली जयदत्त सोसायटी होती. या सोसायटीत सुरुवातीला २० सभासद होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी ठरविले की, आपण स्वयं पुनर्विकास करायचा. त्यानुसार त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी एका खाजगी विकासक कंपनीशी संपर्क साधला आणि काम सुरू केले.

प्रथम "सेल्फ रीडेवलप्पड आरबीआय एम्प्लॉइज जयदत्त सोसायटी, बोरिवली" ची स्थापना केली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे फुकट गेली तरी सर्व सभासदांनी जिद्द सोडली नाही. त्यानंतर सुमारे अडीच वर्षांमध्ये तीन मजली इमारत असलेली सोसायटीचे रूपांतर आता सुसज्ज अशा नऊ मजली सोसायटी मध्ये झाले आहे. सुरुवातीला २० सभासद होते आता ३५ सभासद झाले आहेत. स्वयं पुनर्विकासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या सोसायटीने अथक प्रयत्न करून आज प्रकल्प पूर्ण केला आहे. हा बोरिवलीतील पहिलाच स्वयं पुनर्विकास प्रकल्प आहे, अशी माहिती प्रकल्पाचे सल्लागार गणेश बारे यांनी दिली.

सर्व ३५ सभासदांना आज उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. मुंबईत सध्याच्या परिस्थितीत अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत. या प्रकल्पातील शेकडो रहिवासी व सभासद वर्षानुवर्षे प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या आरबीआय कर्मचाऱ्यांच्या जयदत्त सोसायटीने मात्र कोरोना काळ सोडला तर फक्त अडीच वर्षात स्वयं पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला ही कौतुकाची बाब आहे असे गौरवोद्गार खासदार गोपाळ शेट्टी  यांनी काढले.

मुंबै बँकेने सुद्धा १००० कोटी पर्यंत कर्जाची तरतूद केलेली आहे. हे सरकार स्वयं पुनर्विकास प्रकल्पाला चालना देते असे गौरवोद्गार आमदार प्रवीण दरेकर यांनी काढले. जयदत्त सोसायटीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद व वास्तुविशारद निलेश कोलाडीया, इंद्रनील चंद्राते आणि गणेश बारे यांनी भरपूर परिश्रम घेतले आहेत. आज सर्व सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.