श्री तेग बहादूर यांचे आत्म-बलिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:02+5:302021-04-30T04:09:02+5:30
भारतीय इतिहासात शीखांचे नववे गुरु श्री तेगबहादूर यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व एका चमचमणाऱ्या नत्रक्षाप्रमाणे दैदीप्यमान आहे. त्यांचा जन्म वैशाख ...
भारतीय इतिहासात शीखांचे नववे गुरु श्री तेगबहादूर यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व एका चमचमणाऱ्या नत्रक्षाप्रमाणे दैदीप्यमान आहे. त्यांचा जन्म वैशाख कृष्ण पंचमीला अमृतसरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गुरु हरगोबिंद आणि आईचं नाव नानकी. नानकशाही कॅलेंडरनुसार या दिव्य इतिहासाला १ मे २०२१ रोजी ४०० वर्षे पूर्ण होतील. अशा गुरूंच्या प्रकटदिनाला त्या परंपरेत ‘प्रकाश होणे’ असे म्हटले जाते. भारतावर मध्य आशियातून आलेल्या मुघलांचं आक्रमण झाले होते, त्या काळी ज्या महान परंपरेने त्या पाशवी आक्रमणाला प्रखर आव्हान दिले, श्री तेग बहादूर त्याच तेजस्वी परंपरेचे प्रतिनिधी होते त्यांचे व्यक्तिमत्त्व तपश्चर्या, त्याग आणि साधनेचे प्रतीक आहे आणि त्यांचे कर्तृत्व शारीरिक आणि मानसिक शौर्याचे अद्भुत उदाहरण आहे. गुरू तेगबहादूरांचा उपदेश हा व्यक्ती निर्माणाचा अनोखा प्रयोगच म्हणायला हवा. नकारात्मक वृत्तींवर नियंत्रण ठेवल्याने सामान्य माणूस धर्माच्या मार्गावरुन चालू शकतो. निंदा-स्तुती, लोभ-मोह, मान-अभिमानाच्या चक्रव्युहात जे अडकतात, ते संकटकाळात खंबीर उभे राहू शकत नाहीत. जीवनात कधी सुख असते तर कधी दुःख असते, सर्वसामान्य माणसाची वर्तणुक त्यानुसार बदलत असते. पण सिद्धपुरुष सुख- दुःखाच्या पलीकडे असतो. गुरू श्री तेगबहादूर यांनी या साधनेबद्दल ‘उसतति निंदिआ नाहि जिहि कंचन लोह समानि’ आणि ‘सुखु दुखु जिह परसै नही लोभु मोहु अभिमानु’ (श्लोक मोहला ९ वा अंग १४२६-पुढे) असे म्हटले आहे. गुरु श्री जी आपल्या श्लोकांमध्ये लिहितात, ‘भै काहु कउ देत नहि नहि भै मानत आन.’ पण मृत्यूची भीती सर्वात मोठी असते. याच भयापोटी मतांतर होऊन व्यक्ती जीवनमूल्यांपासून दुरावते आणि भेकड बनून राहते. ‘भै मरबे को बिसरत नाहिन तिह चिंता तनु ज़ारा.’ गुरु श्री जी आपल्या उपदेशाने आणि कार्याने एका अशा समाजाची रचना करत होते, जो सर्व प्रकारची चिंता आणि भीतीतून मुक्त होऊन धर्माच्या मार्गावर चालेल. गुरू श्री जींचं संपूर्ण जीवन म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी स्वतःच्या गृहस्थजीवनातून अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांची साधना करत असताना कुटुंब आणि समाजात उत्कृष्ट असे मानवी मूल्यांचे दर्शन घडविले. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. संकटकाळातही त्यांनी आशा आणि दृढ विश्वासाची कास सोडली नाही. त्यांनी म्हटलेच आहे, ‘बलु होआ बंधन छुटे सभु किछु होत उपाइ.’ गुरु तेगबहादूर यांच्या कर्तृत्वाने खरोखरच देशामध्ये बळ संचरू लागले, बंधने गळून पडली आणि मुक्तीचा मार्ग दिसू लागला. ब्रज भाषेतील त्यांची उपदेशवाणी म्हणजे भारतीय संस्कृती, दर्शन व अध्यात्मिकतेचा दुग्ध शर्करा योग आहे.
गुरु श्री जी जिथे राहत होते, त्या आनंदपूर साहिबमध्ये मुघलांच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध जनसंघर्षाचे एक केंद्र उभे राहात होते. औरंगजेबाला हिंदुस्थानास दारुल-इस्लाम बनवायचे होते. काश्मीर बौद्धिक आणि आध्यात्मिक केंद्र असल्यामुळे मुघलांनी ते लक्ष्य बनवले होते. म्हणून काश्मीरचे काही लोक गुरू श्री जींकडे या सर्व विषयांवर मार्गदर्शन घ्यायला आले. गुरू श्री जींनी यावर गहन विचार मंथन केले. काश्मीरसह संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर होती. पण भारताला दारुल-इस्लाम बनवण्याचे मुघलांचे हे क्रूर कृत्य कसे थांबवता येईल? आता यावर एकच मार्ग होता. देश आणि धर्माच्या रक्षणासाठी एखाद्या महापुरुषाचे आत्म-बलिदान! त्या बलिदानातून जनजागृतीचे तुफान उठेल ज्याच्यासमोर हे मुघल आक्रमकांचे साम्राज्य खिळखिळे होऊन जाईल. पण प्रश्न असा होता की हे बलिदान कोण देईल? गुरू श्री तेगबहादूर यांचे सुपुत्र श्री गोविंदराय यांनी यावर उपाय सुचवला आणि ते आपल्या वडिलांना म्हणाले, ‘या वेळी संपूर्ण हिंदुस्तानात तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण आहे?’
औरंगजेबाच्या सैन्याने गुरू श्री तेगबहादूर व त्यांच्या तीन साथीदारांना कैद केले. सर्वांना कैद करून दिल्लीत आणले. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. इस्लाम स्वीकार करण्यासाठी त्यांच्यावर आणि त्यांच्या शिष्यांवर हर तऱ्हेचा दबाव टाकण्यात आला. त्यांना धर्मगुरू बनवण्याचे आणि सुख समृद्धी प्रदान करण्याचे आश्वासनसुद्धा दिले गेले. पण ते धर्माच्या मार्गावरून ढळले नाहीत. दिल्लीच्या चांदणीचौकात श्री गुरु तेगबहादूर यांच्या डोळ्यांसमोर भाई मतिदास यांना करवतीने मधोमध कापून टाकले, भाई दिया यांना उकळत्या तेलात फेकून दिले आणि भाई सतीदास यांना कापसाच्या ढिगाऱ्यात बांधून जाळून टाकले. मुघल शासकांना वाटले की त्यांच्या साथीदारांवरील अत्याचार पाहून गुरू श्री जी भयभीत होतील. परंतु गुरू श्री जींना माहीत होते की अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा देणे म्हणजेच धर्म होय. ते खंबीर राहिले. काजीने आदेश दिला आणि जल्लादाने श्री गुरु तेगबहादूर यांचं शीर धडापासून वेगळे केले. त्यांच्या आत्मबलिदानामुळे संपूर्ण देशात एक नवीन चैतन्य निर्माण झाले. दहावे गुरू श्री गुरु गोविंदसिंह आपल्या वडिलांच्या बलिदानाबद्दल म्हणाले-
तिलक जंजू राखा प्रभ ताका। कीनो बड़ो कलू महि साका।
साधनि हेति इति जिनि करी। सीस दीआ पर सी न उचरी।
श्री गुरू तेगबहादूरांच्या प्रकट होण्याची म्हणजेच प्रकाश होण्याची चारशेवी वर्षपूर्ती आज संपूर्ण भारतभर साजरी केली जात असताना त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. आज सगळीकडे भोग आणि भौतिक सुखाची एक स्पर्धाच सुरू आहे. परंतु गुरुजींनी तर त्याग आणि संयमाचा मार्ग दाखवला होता. आज सर्वत्र मत्सर-द्वेष-स्वार्थ आणि भेदभावाचे वातावरण आहे. गुरू तेगबहादूरजी सृजनशीलता, समरसता आणि मनोविजयाच्या साधनेबद्दल सांगून गेले आहेत. दिल्लीला जाताना ते ज्या ज्या गावांतून गेले तिथले लोक आजही तंबाखूसारख्या घातक पदार्थांची शेती करत नाहीत हा त्यांच्या साधनामय आचरणाचाच तर प्रभाव होता. आज जगामध्ये कट्टरपंथी आणि धर्मांध शक्ती पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. श्री तेगबहादूरजींनी आपल्याला त्याग, शौर्य आणि बलिदानाचा मार्ग दाखवला आहे. संपूर्ण मानवजात आता परिवर्तनाच्या एका नव्या टप्प्यावर प्रवेश करत आहे. अशा वेळी श्री गुरू तेगबहादूरजींनी दाखवलेल्या मार्गावर चालून, आपल्याच मातीत ज्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत असा नवा भारत निर्माण करणे हीच श्री गुरु तेगबहादूर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- दत्तात्रेय होसबाळे
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आहेत.)
मराठी अनुवाद : जयेश शत्रुघ्न मेस्त्री