मुंबई : शेती खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ब्राझीलमधून धान्य आयातीसाठीचा प्रस्ताव माझ्याकडे सहीकरिता आला. त्याचे मला खूप वाईट वाटले. परंतु, पुढील सहा वर्षांत आपण शेती उत्पादनात स्वयंपूर्ण झालो. आता आपण इतर देशांना निर्यात करतो आहोत. हे सगळे शेतकऱ्यांबरोबरच या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमुळे शक्य झाले, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला.
‘यशवंतराव चव्हाण सेंटर’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’चे वितरण रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. गेली तीन वर्षे ही फेलोशिप दिली जात आहे. यंदाही शेतीसाठी ८०, साहित्यासाठी १२ आणि शिक्षणासाठी ४० अशा एकूण १३२ जणांना यावेळी फेलोशिप देण्यात आली. यावेळी ‘एमकेसीएल’चे विवेक सावंत, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्याेजकतेत आपली मुले इथे मागे पडतात; परंतु परदेशात चांगली कामगिरी करतात. हे असे का होते, याचा विचार व्हायला हवा. एकत्र येऊन काम करण्याची संस्कृती आपल्यात पुरेशी रूळलेली नाही. सामूहिकरीत्या एकमेकांच्या मदतीने उद्योजकता साध्य व्हायला हवी, अशी अपेक्षा ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.