Join us

सेल्फ टेस्ट किटवर लवकरच येणार बंधन; पालिका जाहीर करणार नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 7:34 AM

मुंबईत दररोज पालिका आणि खासगी प्रयोगशाळेत सुमारे ५० हजार ते ६० हजार कोविड चाचण्या केल्या जातात.

मुंबई: मागील काही दिवसांपासून मुंबईत घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेल्फ टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर काही वेळा रुग्ण पालिकेला कळवत नसल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे यापुढे कोरोना टेस्टचे सेल्फ किट विकणाऱ्या औषध विक्रेत्यांना सेल्फ टेस्ट किटचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईत दररोज पालिका आणि खासगी प्रयोगशाळेत सुमारे ५० हजार ते ६० हजार कोविड चाचण्या केल्या जातात. तरीही सेल्फ किट आणून घरीच कोविड चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या चाचणीचा अहवाल पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी किटवरील स्कॅनरच्या माध्यमातून नोंद करणे गरजेचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

कोविडची लागण झाल्यानंतर आवश्यक खबरदारीही घेतली जात नसल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पालिका आता औषध विक्रेता, मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सेल्फ टेस्ट किट विकल्यानंतर संबंधिताचा संपर्क क्रमांक, पत्ता याची नोंद करून ठरावीक वेळेत अहवालाची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका