Join us

काळजाला भिडणारा 'सेल्फी', बोमन इराणींचे लाईक, 'बिग बीं'ची कमेंट तर सिद्धार्थ बसूंचा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 19:56 IST

सोशल मीडियावर या सेल्फीला मोठा प्रतिसाद मिळत असून लाईक्सचा पाऊस पडत आहे. तर, मोठ्या प्रमाणात कमेंट आणि शेअरचाही मानकरी हा फोटो ठरला आहे.

मुंबई - सध्या सोशल मीडियावर चिमुकल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. आनंद आपल्या मानण्यात आहे, असे म्हणत कुणी हा फोटो शेअर करतोय. तर कुणी, सेल्फी ऑफ द इयर नावाने या कॅप्शनने हा फोटो शेअर करतोय. तर, काहींच्या काळजाला हात घालणारा असा हा फोटो ठरला आहे. या फोटोत 5 चिमुकली मुले दिसत असून त्यापैकी एकाच्या हातात स्लीपर चप्पल आहे. या चप्पललाच कॅमेरा बनवून सेल्फीचा आनंद लुटताना ही वयानं लहान असलेली मुलं मोठा आनंद मिळवत असल्याचं दिसून येतंय. 

सोशल मीडियावर या सेल्फीला मोठा प्रतिसाद मिळत असून लाईक्सचा पाऊस पडत आहे. तर, मोठ्या प्रमाणात कमेंट आणि शेअरचाही मानकरी हा फोटो ठरला आहे. अभिनेता बोमन इराणी यांनाही हा फोटो शेअर करणं राहावलं नाही. तर टीव्ही प्रोड्युसर सिद्धार्थ बसू यांनीही कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून मला हसू येत नाही किंवा माझ्या घशातून एक शब्दही फुटत नाही, असे सिद्धार्थ बसू यांनी लिहिले आहे. तर फोटोग्राफर अतुल कसबेका यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून अमिताभ बच्चन यांनीही यावर कमेंट केली आहे. मात्र, मी चुकत नसेल तर हा आदरपूर्वक सांगतो, हा फोटो म्हणजे फोटोशॉपचा प्रकार असू शकतो असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. तर, अतुल यांनी अमिताभ यांच्या या ट्विटला उत्तर देताना या फोटोची खात्री केली असून हा फोटोशॉप नसल्याचं म्हटलंय. तसेच फोटोत सेल्फी घेणाऱ्या चिमुकल्याचा हात दिसणारा मोठा हात म्हणजे स्मार्टफोनच्या परस्पेक्टीव्ह डिस्टॉर्शनचा भाग असल्याचंही म्हटलंय. दरम्यान, या दिग्गजांसह अनेक नेटीझन्सनी हा फोटो शेअर केला आहे.  

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअमिताभ बच्चनसेल्फी