पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सेल्फी स्पर्धा
By Admin | Published: May 18, 2017 02:30 AM2017-05-18T02:30:51+5:302017-05-18T02:30:51+5:30
पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या २४ तारखेला पार पडणार आहे. पालिकेच्या ७८ जागांसाठी २० प्रभागात ही निवडणूक होत आहे. याकरिता निवडणूक आयोग सज्ज झाला
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या २४ तारखेला पार पडणार आहे. पालिकेच्या ७८ जागांसाठी २० प्रभागात ही निवडणूक होत आहे. याकरिता निवडणूक आयोग सज्ज झाला असून पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त व निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी फोटो सेल्फी स्पर्धेचे आयोजन केले आहे. १०० भाग्यवान मतदारांना करामध्ये २५ टक्के सूट मिळणार आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण ४ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. मतदानाचा आढावा घेतल्यावर मतदानाची टक्केवारी वाढलेली न दिसल्याने ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पनवेल पालिका निवडणुकीत सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्र्धकांसाठी पालिकेने एक व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. मतदान करून शाई लावलेल्या बोटासह फोटो मतदार यादीतील नावासह व्हॉट्सअॅप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण कुटुंबासह फोटो पाठविणाऱ्या मतदारांना विजेत्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. फोटोची छाननी केल्यानंतर प्रत्येक प्रभागातून पाच याप्रमाणे १०० विजेत्यांना करामध्ये २५ टक्के सूट मिळेल. Þ३0 मे रोजी या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
त्यानंतर विजेत्यांना पनवेलमधील हॉटेल असोसिएशनशी जोडलेल्या हॉटेलमधील बिलावर २५ टक्के सूट मिळणार आहे.
- बाहुबलीने मतदान करण्यास नकार दिल्यामुळे त्याला कटप्पाने मारले, म्हणून तुम्हीही मतदान करा असे या जनजागृती फलकावर
लिहिले आहे
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहोत. यामध्ये निवडणुकीदरम्यान देशात पहिल्यांदाच फोटो सेल्फी स्पर्धा, पनवेल हॉटेल असोसिएशनअंतर्गत असलेल्या हॉटेल्समध्ये बिलावर २५ टक्के सूट तसेच विविध ठिकाणी पथनाट्य, पोवाड्याद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे . पनवेल महानगरपालिकेत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल. - राजेंद्र निंबाळकर, आयुक्त व निवडणूक अधिकारी