मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली होती. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड 3 मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. आता, किरीट सोमय्यांनी या बंगल्याचे बिफोर आणि अफ्टर असे फोटो शेअर केले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्याची माहिती यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरुन दिली होती. तसेच, करुन दाखवलं, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचेही सोमय्यांनी म्हटले होते. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदेशीर बंगला असल्याबाबत त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर, या बंगल्याच्या पाडकामाला ऑगस्ट महिन्यात सुरूवात झाली. मात्र, आता हा बंगला जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे, किरीट सोमय्यांनी ट्विट करुन या बंगल्याचे अगोदरचे फोटो आणि सद्यस्थितीचे फोटो शेअर केले आहेत.
सोमय्यांनी जमीनदोस्त झालेल्या बंगल्यासोबत, म्हणजे मोकळ्या जागेसह आपला सेल्फी काढला आहे. दापोली समुद्र किनाऱ्यावरील मिलिंद नार्वेकर (शिवसेना) यांचा जमीनदोस्त झालेला बंगला. फोटोमध्ये जुलै महिन्यात बंगल्याचा फोटो दिसत आहे, तर त्याचठिकाणी डिसेंबरमध्ये बंगला पाडल्यानंतरचा दुसरा फोटोही सोमय्यांनी शेअर केला आहे. दरम्यान, आज दुपारी किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट संदर्भातही किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे. अनिल परब यांचे हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय पथकाने सुद्धा या रिसॉर्टची पहाणी केली होती.