मुंबई : ट्रान्सहार्बर लिंक पूल अर्थात अटल सेतूवर सेल्फी, फोटो काढणाऱ्या ३९० जणांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या सर्वांनी पुलावर वाहने थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. अटल सेतूचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या पुलावर विनाकारण थांबण्यास व वाहन उभे करण्यास मनाई आहे. तरीदेखील अनेक चालक या सेतूवर वाहने थांबवून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली.
पोलिसांचा इशाराया पुलावर दुचाकी व तीनचाकी वाहनाला प्रवेशबंदी आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत ‘नो पार्किंग’, वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.