मुंबई : डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी विविध सवलतींसाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना सरकारला साकडे घातल अआहेत. मात्र, केंद्रीय मंत्र्यांपासून ते नामांकित बँकर्सपर्यंत प्रत्येक जण घरांच्या किंमती कमी करून ती विका आणि आर्थिक अरिष्ट टाळा असेच सल्ले या विकासकांना देताना दिसत आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी करण्यासाठी विकासकांवरील दबाव दिवसागणीक वाढू लागला आहे.
आर्थिक अडचणीत असले तरी विकासक घरांच्या किंमती करत नाहीत. बँकांच्या कर्जांचे हप्ते भरत बसतील. पण भाव कमी करणार नाही. परंतु, आता जास्त लोभ बाळगू नका. जो माल तयार आहे तो विकून मोकळे व्हा. प्रसंगी ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विका अशा शब्दात सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कान टोचले होते. त्यानंतर एचडीएफची बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी घरांच्या किंमती २० टक्क्यांनी कमी कराव्या लागतील असे विकासकांना सांगितले होते. चार दिवसांपूर्वी झालेल्या वेबिनारमध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीसुध्दा विकासक मारूती कारमधून मर्सिडीजपर्यंत गेले. तरी त्यांचे रडगाणे काही थांबत नाही अशा शब्दात विकासकांना कानपिचक्या दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीसुध्दा सरकारच्या सवलतींवर विसंबून न राहता घरांच्या किंमती कमी करून ती विकण्यावर भर द्यावा असा सल्ला दिला. त्यापाठोपाठ नामांकित बँकर उदय कोटक यांनीसुध्दा घरांच्या किंमती कमी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर घरांच्या किंमती आता नक्की कमी होणार असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाव्य ग्राहकांनी आणखी काही काळ प्रतिक्षा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे किंमती कमी करण्यासाठी विकासकांवरील दबाव वाढू लागला आहे.
सरकारच्या खांद्यावर भार नको
घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मुद्रांक शुल्क कमी करा, बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील घर खरेदीसाठी लागू होणारा जीएसटी रद्द करा, प्रिमियमचे दर कमी करा, विकास शुल्कात सवलती द्या अशी अनेक मागण्या विकासकांच्या संघटनांकडून केल्या जात आहेत. मात्र, या मागण्या मान्य केल्यास सरकारचा महसूल घटणार आहे. परंतु, हा भार सरकारच्या खांद्यावर न टाकता विकासकांनीच घरांच्या किंमती कमी करून स्वतःची कोंडी दूर करावी असा सरकारी मतप्रवाह असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
आवाहनाचा जाहिरात फंडा
विकासकांना केलेल्या आवाहनाचा जाहिरातीसाठी उपयोग विकासकांच्या संघटनांनी जाहिरातीसांठी सुरू केला आहे. पीयूष गोयल, दीपक पारेख आणि उदय कोटक हे स्वतःच्या मालकीच्या घरांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्यासारखेच तुम्ही सुध्दा स्वतःच्या घरात रहायला जा … घर खरेदी करा अशा आशयाची जाहिरात व्हायरल केली जात आहे. .