ग्राहकांअभावी फूल मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ; कोरोनाचा मोठा आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:57 AM2020-07-21T01:57:52+5:302020-07-21T01:58:09+5:30
दररोजची ८० लाखांची उलाढाल ठप्प
- खलील गिरकर
मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मुंबईत येणाऱ्या फुलांचा ओघ प्रचंड आटला असल्याने फूल उत्पादक शेतकरी, फूल विक्रेते यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या अशा दादर येथील मुंबई महापालिकेच्या स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे मंडई ( फूल मार्केट) मधील बहुसंख्य दुकाने बंद असल्याने फूल उत्पादक शेतकरी व फूल विक्रेत्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यांची दररोज सुमारे ८० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
दादर फूल मंडईमध्ये सुमारे साडेसहाशे परवाना धारक फूल विक्रेते आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर २० मार्चपासून ही मंडई बंद करण्यात आली होती. अनलॉक ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या मंडईमध्ये 8 जून पासून फूलविक्रेत्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगसाठी १०० विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे या मंडईकडे पूर्वीच्या तुलनेत अतिशय तुरळक ग्राहक फिरकत असल्याने १०० जणांना परवानगी मिळून देखील अवघे २० ते २५ फूल विक्रेते येतात. त्यामुळे सध्या या मंडईत नाममात्र फूल विक्री होत आहे. पूर्वी दिवसाला सुमारे या ठिकाणी १५ ते २० टेम्पो फूले येत होती. आता अवघी दोन ते तीन टेम्पो फूले येतात.
या मंडईचे महापालिकेचे निरीक्षक धर्मा राठोड यांच्या माध्यमातून या मंडईत सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहावे यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. राठोड स्वत: या सर्व कामांवर लक्ष ठेवून असतात. मंडईमध्ये कोरोना प्रतिबंधक औषधे फवारणी देखील नियमितपणे केली जात आहे. याबाबत, स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे मंडई, फूल बाजार व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज पुंडे म्हणाले, कामगार व विक्रेते आपापल्या गावी गेले होते. या मंडईत दोन हजार जण कार्यरत होते त्यावर अवलंबून असणाºया हजारो जणांच्या आर्थिक उत्पन्नावर टाच आली आहे. सध्या कोल्हापूर सांगली व पुणे जुन्नर येथून माल येतो.
मंडईतील व्यापारी व कामगार मुंबई परिसरात राहणारे आहेत त्यांना येण्या जाण्याची सोय नाही त्याचा देखील परिणाम होत असल्याचे मत पुंडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी नव्याने फुलांची शेती करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुरेशी फूले मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1सरकारने गणेशोत्सवामध्ये फुलांच्या वापरावर निर्बंध लादू नयेत, चीनची खोटी फूले बाजारात येत आहेत त्यावर बंदी लादावी अशी /मागणी त्यांनी केली. जोपर्यंत मुंबईत उपनगरीय लोकल सुरु होणार नाही, मंदिर व दर्गाह, हॉल, मॉल, हॉटेल सुरू होणार नाहीत. तोपर्यंत फुलांच्या मागणीत वाढ होणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
2निरीक्षक धर्मा राठोड यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्यांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून दिले. राठोड यांनी व्यक्तिगतपणे व फुलबाजार व्यापारी मंडळातर्फे या कामगारांना तीन महिने चहा नाष्टा पुरवण्यात आल्याचे पुंडे यांनी सांगितले.