मुंबई - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याबाबत पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधले. महाविद्यालयांच्या ठिकाणी अमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे अकरावी, बारावीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. अमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत असून हे रोखण्यासाठी दोषींना फाशी देणारा कडक कायदा करा, अशी मागणी पवार यांनी केली.मुंबईच्या धर्तीवर ठाणे, पुणे व नागपूर आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. गुन्ह्यांचे प्रकरण दिवाणी ऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षाची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षांची २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कारवाईअंतर्गत एक हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३ रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत आझाद मैदान, वरळी, वांद्रे, घाटकोपर व कांदिवली युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
अमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या! अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 5:21 AM