लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मद्यविक्रीस मनाई असतानाही अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेल सहारा स्टारमध्ये सर्रास मद्यविक्री सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे #NODRYDAY अशी सोशल मीडियावर जाहिरात करून मद्य घेणाऱ्या ग्राहकांना ३ ऑक्टोबरच्या तारखेचे बिल देऊन त्यावर चुकीचा जीएसटी क्रमांक टाकण्याचाही प्रकार या निमित्ताने उघडकीस आला आहे. पुणे येथे राहणारे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन लोकमतशी बोलताना म्हणाले, आपण काही कामानिमित्त मुंबईत आलो असता रविवारी सोशल मीडियावर #NODRYDAY अशी जाहिरात पाहावयास मिळाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपण त्यावर उल्लेख केलेल्या हॉटेल सहारा स्टारमधील मेन्शन क्लबमध्ये गेलो असता तेथे ड्राय डे असतानाही खुलेआम मद्यविक्री होत असल्याचे पाहावयास मिळाले. पुराव्यादाखल मद्य मागितले. तासाभराने तेथून निघताना बिलाची मागणी केली. हाती आलेल्या बिलावरील ३ ऑक्टोबरची तारीख पाहून आपल्याला धक्काच बसला. चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या आपल्या पत्नीने त्या बिलावरील जीएसटी क्रमांकही चुकीचा असल्याचे ओळखल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ड्राय डे असतानाही अशा काही हॉटेलांमध्ये मद्यविक्री होणे म्हणजे पैशांसाठी निर्लज्जपणा केला जाण्याचा कळस आहे. हा राष्ट्रपित्याचा अपमान असून याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी अक्षय जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, कोणीही फोनवर आले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"