Join us

बोगस बियाणे विकाल तर अजामीनपात्र गुन्हा, फडणवीसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:12 PM

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोगस बियाणे, खते यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. चालू अधिवेशनातच या संबंधीचा कायदा केला जाईल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकमतला सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोगस बियाण्याबाबतचा विषय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला होता. जळगाव जिल्ह्यात अशा बियाण्यांचा सुळसुळाट असल्याचे ते म्हणाले होते त्यावर आता बोगस बियाणे खते या संदर्भात कडक कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोगस बियाण्यांवरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची केवळ विरोधकांनाच चिंता आहे असे नाही, तर सरकारलाही गांभीर्य आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी सरकारचे सर्व परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. बीटी कॉटनचे बियाणे बोगस निघाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. त्याच धर्तीवर अन्य बोगस बियाणे, खते यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा केला जाईल,  असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशेतकरी