ऑनलाईन फर्निचर, मशीनची विक्री महागात
By गौरी टेंबकर | Published: December 26, 2023 05:44 PM2023-12-26T17:44:14+5:302023-12-26T17:44:28+5:30
काही क्षणातच महिलेचा फोन हँग झाला आणि त्यातून धडाधड रक्कम वजा होत एकूण १.१७ लाख रुपये काढून घेण्यात आले.
मुंबई: वॉशिंग मशीन तसेच फर्निचरची विक्री ओएलएक्स ॲपवरून ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात एका २२ वर्षीय तरुणीला १.१७ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला. ही तरुणी मूळची राजस्थानची राहणारी असून खाजगी कंपनीमध्ये डील ॲडव्हायझरी अनालिस्ट म्हणून काम करते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तिने सदर अँपवर २३ डिसेंबर रोजी फर्निचर आणि वाशिंग मशीन विकायची असल्याची जाहिरात टाकली होती. तिच्या कंपनीने वर्क फ्रॉम होम करायची परवानगी दिल्यामुळे तिला तिच्या राजस्थान येथील मूळ गावी परतायचे होते. त्यामुळे सदर वस्तूंचा आता तिला उपयोग होणार नव्हता तेव्हा त्याची विक्री करण्याचे तिने ठरवले.
दरम्यान तिला एका अनोळखी व्यक्तीने फोन करत मशीन तसेच फर्निचर खरेदी करायचे असल्याचे सांगितले. पैसे देण्यासाठी त्याने एक स्कॅन पाठवला ज्यावर दोन रुपये पेड करायला सांगितले. त्यानुसार तिने ते पैसे पेटीएम मार्फत पाठवले आणि तिला पुन्हा चार रुपये प्राप्त झाले. मात्र काही क्षणातच तिचा फोन हँग झाला आणि त्यातून धडाधड रक्कम वजा होत एकूण १.१७ लाख रुपये काढून घेण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने या विरोधात मेघवाडी पोलिसात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.