ऑनलाइन औषध विक्री करताय? मग कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:07 AM2023-02-16T08:07:07+5:302023-02-16T08:07:24+5:30
राष्ट्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची विक्रेत्यांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन औषध विक्रीस बंदी असतानाही सर्रास विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही विक्री होत असल्याने अनेकदा औषधांचा गैरवापर होत असल्याच्या घटना घडतात. याविषयी नुकतेच राष्ट्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने देशभरातील औषध विक्रेत्यांना नोटीस पाठवून याविषयीचा जाब विचारला आहे.
औषधांच्या स्वैर वापरामुळे नागरिकांना औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेने सर्व ऑनलाइन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी दोन दिवसांत नोटीसला उत्तर न दिल्यास संबंधित कंपन्यांची ‘काहीही भूमिका नसल्याचा’ प्रतिसाद गृहित धरला जाणार आहे. तसेच, भविष्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाणार असल्याचे राष्ट्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने कळविले आहे.
सात वर्षांपासून अवैधपणे विक्री अनेकदा चुकीचे औषध विकल्याप्रकरणी औषध विक्रेत्यांवर कारवाई होते. काही प्रकरणांत अगदी परवानाही रद्द केला जातो. मात्र, गेल्या सात वर्षांपासून ऑनलाइन व्यासपीठांवर सर्रास औषध विक्री सुरू आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे आता तरी याविषयी यंत्रणांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.
– अभय पांडे,
अध्यक्ष, ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन
या औषधांच्या
विक्रीचे नियम कडक
किरकोळ विक्रीसाठी परवानगी असलेले
नोंदणीकृत औषध विक्रेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा करण्यात येणारी शेड्यूल एच, एचआय आणि एक्स या प्रकारातील औषधे केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या वैध चिठ्ठीच्या आधारे विकणे बंधनकारक आहे.
ॲप, संकेतस्थळांवर सर्रास विक्री
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून, विविध मोबाइल ॲप्लिकेशन्ससह ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. याबाबत केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेकडे अनेक तक्रारी आणि निवेदने आली होती.