लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घराचे भाडे भरण्यासाठी जन्मदात्या आईने स्वत:च्या मुलीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मालाडमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या विक्रीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी महिला दलालाला बनावट ग्राहकाकडून व्हॉट्सअपवर संपर्क केला. त्यानुसार दलालाने १७ वर्षांच्या मुलीसाठी ५० ते ६५ हजार रुपयांपर्यंत खर्च येईल, असे सांगितले तर २४ वर्षांच्या तरुणीसाठी १५ हजार रुपये नक्की केले. त्यानुसार पोलीस अधिकारी दलालाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. यावेळी घटनास्थळी मुलींना घेऊन पोहोचलेल्या दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यात एका महिलेला सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले. यावेळी केलेल्या चौकशीत अल्पवयीन मुलीला तिच्या आईनेच विकल्याचे उघड झाले. घराचे भाडे भरण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचेही उघड झाले.