बँकेचे कर्ज थकलेली पोकलेन विकत ७७ लाख लाटले ! व्यवसायिकाची वाकोला पोलिसात धाव
By गौरी टेंबकर | Published: December 25, 2023 04:36 PM2023-12-25T16:36:17+5:302023-12-25T16:37:43+5:30
बँकेचे कर्ज थकवलेली पोकलेन विकून जवळपास ७७ लाखांचा चुना एका व्यावसायिकाला लावण्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला.
गौरी टेंबकर, मुंबई: बँकेचे कर्ज थकवलेली पोकलेन विकून जवळपास ७७ लाखांचा चुना एका व्यावसायिकाला लावण्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात धाव घेतल्यानंतर रानीसल मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक तसेच अन्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार अंगडसिंग शेटी (२७) यांचा पोकलेन आणि क्रेनविक्रीचा व्यवसाय असून जगभरामध्ये ते या मशिनरी पुरवतात. त्यांचे ऑफिस सांताक्रुझ परिसरात आहे. त्यांनी वाकोला पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै, २०२३ मध्ये एका मित्रा मार्फत बिहारच्या रानीसल मेटल्स प्रा ली मधील पंकज सिंग यांच्याशी ओळख झाली. सिंग याला पोकलेन विकायची असल्याचे सांगितल्यानंतर ८९ लाख ७० हजारामध्ये तो व्यवहार नक्की झाला. शेटी यांनी आरटीजीएस मार्फत पैसे देत पोकलेन विकत घेतले.
या व्यवहारामुळे तक्रारदाराचा सदर कंपनीवर विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर, २०२३ मध्ये पुन्हा रानीसल कंपनीने पोकलेन विकायचे सांगत त्याचा व्यवहार ७७ लाखांना ठरवला. शेटी यांनी ते पैसे देखील आरटीजीएस मार्फत दिले. रानीसल कंपनीने त्यांना ऑक्टोबर महिन्यात मोबाईलवर टॅक्स इन्व्हाईस पाठवले ज्यात सदर मशीनवर कोणतेही लोन नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र २६ ऑक्टोबरला खालापूर टोल नाक्यावर कोटक महिंद्रा बँकेच्या रिकव्हरी टीमने सदर पोकलेन मशीन पकडली. अधिक चौकशीमध्ये या मशीनवर लोन असल्याचे उघड झाले.
याबाबत पंकजला संपर्क केल्यावर दोन ते तीन दिवसात बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देतो असे त्याने सांगितले. मात्र त्यांनी अद्याप कर्ज भरले नाही तसेच तक्रारदाराला प्रतिसाद देणेही बंद केले. याप्रकरणी तक्रार दिल्यावर पंकज, रानीसल कंपनीचा संचालक समीरकुमार साहू तसेच इतरांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.