लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरातील वाशिंग मशिन ओएलएक्सवर विकण्यासाठी ठेवणे घरकाम करणाऱ्या महिलेला चांगलेच महागात पडले. तिला एका भामट्याने मशिन खरेदी करण्याचे सांगत ८२ हजारांची फसवणूक केली. याविरोधात त्यांनी निर्मलनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.तक्रारदार रेश्मा शेख (३५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांच्या जुन्या वॉशिंग मशिनचा फोटो ओएलएक्सवर टाकला होता. त्यानंतर त्यांना एक फोन आला आणि तुम्ही ओएलएक्सवर तुमची मशिन विक्रीसाठी टाकली आहे ती मला खरेदी करायची आहे, असे सांगितले. त्यामुळे शेख यांनी त्यांचा पत्ता त्याला पाठवून दिला.
काही वेळाने स्वतःची ओळख मालाडमध्ये वॉशिंग मशिनचे होलसेल शॉप चालवणारा विनोद शर्मा असे सांगणाऱ्या व्यक्तिचा फोन आला. त्याने शेख यांची मशिन त्याला खरेदी करायची आहे, असे सांगत सात हजार रुपये ऑनलाइन पाठवतो, तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर पाठवा, असे म्हणाला. यावर माझा मोबाइल नंबर गुगल पे वर आहे, तेव्हा तुम्ही त्यावर पैसे पाठवा, असे शेख म्हणाल्या. मात्र, तुम्हाला पैसे मिळण्यासाठी मी क्यूआरकोड पाठवतो तो स्कॅन करा, असे शर्माने सांगितले. ही प्रक्रिया करताना बोलण्यात गुंतवत आरोपीने शेख यांच्या खात्यातील ८२ हजार ५०७ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी तक्रार देण्यासाठी निर्मलनगर पोलिस ठाणे गाठले.