उपनगरी रेल्वे मार्गावर धावणार सेमी एसी लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:23 AM2019-08-01T06:23:49+5:302019-08-01T06:24:09+5:30
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (आयसीएफ) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर संपूर्ण १२ डब्यांची एसी लोकल दाखल होईल.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावर सेमी एसी (पार्शल) लोकल लवकरच धावताना दिसेल. ९ डबे नॉन एसी आणि ३ डबे एसीचे अशी रचना अशी ही सेमी एसी लोकल असेल. प्रवाशांना या लोकलमध्ये प्रवास करण्याचा लाभ आॅक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल चालविण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी एसी लोकलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी दोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी सेमी एसी लोकलची संकल्पना मांडण्यात आली आहे. ती आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्षात येईल.
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (आयसीएफ) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर संपूर्ण १२ डब्यांची एसी लोकल दाखल होईल. सप्टेंबर महिन्यापासून या एसी लोकल येण्यास सुरुवात होईल. त्यांची पुनर्बांधणी करणे प्रत्येक झोनची जबाबदारी असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या एसी लोकलच्या पुनर्बांधणीमध्ये नॉन एसीचे डबे आणि एसीचे डबे किती जोडायचे याची आखणी केली जाईल. साधारण ९ डबे नॉन एसी आणि ३ डबे एसीचे अशी रचना असेल. यासह सेमी एसी लोकलमध्ये ६ डबे नॉन एसी तर ६ डबे एसीचे असतील.