सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:04 AM2024-10-28T08:04:09+5:302024-10-28T12:10:30+5:30
द भारत डायमंड बोर्स यांच्यावतीने ‘इंडियन फॉरेन पॉलिसी’ या विषयावर मंत्री जयशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन बीकेसी येथील सभागृहात करण्यात आले होते.
मुंबई : जगभरात आगामी दशकात सेमीकंडक्टर उद्योग महत्त्वाचा ठरणार असून, जगातील सत्तेचा समतोल करण्याचे काम हा उद्योग करेल, असे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले. द भारत डायमंड बोर्स यांच्यावतीने ‘इंडियन फॉरेन पॉलिसी’ या विषयावर मंत्री जयशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन बीकेसी येथील सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी जयशंकर यांनी जगभरातील देशांशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. तसेच उद्योगांच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या धोरणांची माहिती दिली. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, उपाध्यक्ष मेहूल शाह, जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेईपीसी) अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भन्साळी उपस्थित होते.
आज प्रत्येक इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाइल, अशा बहुतांश क्षेत्रातील उद्योगांमध्ये सेमीकंडक्टर महत्त्वाचा आहे. या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता असेल, असे जयशंकर यांनी नमूद केले. आज भारताकडे गुंतवणूकदार आशेने पाहत आहे. यामागे देशात असलेले राजकीय स्थैर्य हे एक कारण आहे. प्रगत देशात सरकार बदलली तरी त्यांची आर्थिक धोरणे बदलत नाहीत. मात्र, विकसनशील देशात सरकार बदलल्यानंतर धोरणात बदल होतो. देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर गुंतवणूकदार जास्त आश्वस्त झाले आहेत. भारताने इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टीक आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यातूनच आता ‘भारताचा काळ’ असल्याचे जगाने मान्य केले आहे.
देशात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदल होत असून, घरोघरी वीज आणि पाण्याची उपलब्धता झाली आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. गेल्या दहा वर्षांत ७५ नवीन विमानतळे उभारली आहेत. त्यातून विमानप्रवास रेल्वे प्रवासाबरोबरच आणला गेला आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांत दरदिवशी नवी दोन कॉलेज उभी राहिली आहेत, याकडेही त्यानी लक्ष वेधले.
सहकार्यावर भर
यावेळी जयशंकर यांनी हिरे व्यापाऱ्यांशीही चर्चा केली. यावेळी सरकार आणि उद्योग विश्वाच्या सहकार्यावर भर देताना त्यांनी देशातील उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचे सहकार्य असलेल्या उद्योगांशी थेट जोडले जाण्याबाबत सकारात्मकता दाखवली. तसेच हिरे उद्योगात तांत्रिक बदलांबरोबरच निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून सहकार्याचेही आश्वासन दिले.
तरुणांबाबत आशावादी
प्रश्नोत्तरांदरम्यान एकाने १४० कोटी लोकसंख्येच्या भारतात केवळ एकच एस. जयशंकर आहेत. देशात ५ ते १० जयशंकर तयार होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न केला. यावर तितकेच समर्पक उत्तर देताना ते म्हणाले, ‘ही पिढी आपल्या पुढे आहे. त्यांना कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. मी भारताबद्दल खूप आशावादी आहे.’
जग भारताकडे आशेने पाहत आहे
जगातील आर्थिक विकास गोंधळलेला आहे. दहा वर्षांपूर्वी युरोपने त्यांच्या व्यापाराची घडी बसविली होती. मात्र, आता युरोपातील सप्लाय चेन बिघडली आहे. त्यातून जग भारताकडे आशेने पाहत आहे, असे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.