Join us

मीरा भाईंदरमधील महापालिकेच्या पोटनिवडणुका रद्द करा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 5:48 PM

मीरारोड - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट २०२२ मध्ये होणार असताना दोन प्रभागातील पोटनिवडणुका एप्रिल - मे वा पावसाळ्यात घेऊन ...

मीरारोड - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट २०२२ मध्ये होणार असताना दोन प्रभागातील पोटनिवडणुका एप्रिल - मे वा पावसाळ्यात घेऊन केवळ दोन महिन्याच्या नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुकाचा खटाटोप नको असे सांगत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पोट निवडणूक रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगा कडे केली आहे. 

भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० ड मधील शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी ९ जून रोजी कोरोना मुळे निधन झाले होते . मीरारोडच्या नया नगर भागातून प्रभाग २२ अ च्या काँग्रेस नगरसेविका उमा सपार यांचे ह्या वर्षी २६ जून रोजी आजारपणाने निधन झाले . ह्या दोन्ही रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकी साठी मतदान यादी व मतदान केंद्र १२ मार्च २०२२ पर्यंत अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे . 

परंतु पालिकेची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपत असल्याने त्या आधीच मे किंवा जून मध्ये आचारसंहिता लागून सार्वत्रिक निवडणूक होणार आहे . त्यामुळे एप्रिल  वा मे मध्ये पोटनिवडणूक घेतल्यास नगरसेवक पद केवळ दोन - तीन महिन्या पुरते असणार आहे . या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे व कोरोनामुळे आधिच ठप्प असलेली नागरी विकास कामे पुर्णत: थांबणार आहेत. कारण सदर पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच दोन महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होण्याची शक्यता आहे.  पालिका निवडणुका पावसाळ्या आधी घ्याव्यात अशी गेल्या अनेक वर्षां पासूनची मागणी असून देखील त्यावर निर्णय घेतला जात नाही. 

त्यातच निवडणूक आयोगाने सुचविल्या नुसार महानगरपालिका प्रशासन, राज्य शासन लोकसंख्येनुसार वाढलेल्या प्रभागासह प्रभाग रचनेच्या कामामध्ये व्यस्त असल्याने या पोटनिवडणुका लागल्यास पालिका प्रशासन, पोलिस आदी सर्वच यंत्रणांवर दुहेरी ताण पडणार असल्याने पोटनिवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी आ. सरनाईक यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान व उपायुक्त अविनाश सणस यांना पत्र पाठवून केली आहे . 

टॅग्स :मुंबईशिवसेना