पालिका निवडणुकीसाठी सेनेची मोर्चेबांधणी

By admin | Published: February 22, 2016 03:25 AM2016-02-22T03:25:21+5:302016-02-22T03:25:21+5:30

राज्याच्या सत्तेत जरी भाजपा-शिवसेना युती असली तरी येत्या २०१७मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतील

Sena's front line for municipal elections | पालिका निवडणुकीसाठी सेनेची मोर्चेबांधणी

पालिका निवडणुकीसाठी सेनेची मोर्चेबांधणी

Next

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई
राज्याच्या सत्तेत जरी भाजपा-शिवसेना युती असली तरी येत्या २०१७मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतील पुढचा महापौर भाजपाचा असेल, असे सूतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी सूत्रे घेतल्यानंतर म्हटले होते. शिवसेनेने हे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे.
रामदास कदम विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर झालेल्या पालिका नगरसेवकांच्या बैठकीत आगामी निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन म्हणजेच शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या शिवसेनेचे नगरसेवक विविध महोत्सव, मालवणी जत्रा, ढोल ताशा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, विविध जाती-धर्मांची संस्कृती प्रतिबिंबित करणारे कार्यक्रम, हळदीकुंकू समारंभ, मोफत आरोग्य शिबिर आदींचे आयोजन करण्यात मग्न झाले आहेत.
सध्या वाहतूककोंडीमुळे गोरेगावकर त्रस्त आहेत. त्यामुळे गोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा गमावलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. गोरेगाव (पूर्व) रेल्वे स्थानकावरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी चक्क उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर, आमदार - विभागप्रमुख सुनील प्रभू हे आपला लवाजमा घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.
सध्या पी (दक्षिण) प्रभाग क्र. ४६ ते ५२पर्यंत असलेल्या प्रभागामध्ये शिवसेनेचे ४, काँग्रेसचे २ सेवक आहेत. तर गोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आमदारकी भाजपाकडे आहे. येथून महिला व बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांनी नुकतेच शिवसेना दिंडोशी महोत्सवाचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून दिंडोशीत राहत असलेल्या २७४ जुन्याजाणत्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार यानिमित्ताने करून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यात आला. दिंडोशीतील सुपुत्रांना या वेळी ‘दिंडोशी भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
या महोत्सवात मराठी, गुजराती, राजस्थानी आणि उत्तर प्रदेशातील संस्कृतीची झलक दिसून आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आंतरशालेय निबंध स्पर्धा, लावणी, भजन असे कार्यक्रमही पार पडले. या महोत्सवाची सांगता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या महोत्सवात सुमारे ५० हजार नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Sena's front line for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.