सेनेचा जल्लोष, काँग्रेस चिडीचूप!
By admin | Published: April 16, 2015 02:15 AM2015-04-16T02:15:53+5:302015-04-16T02:15:53+5:30
वांद्रे पूर्वेकडील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे मातब्बर उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केला.
सचिन लुंगसे - मुंबई
वांद्रे पूर्वेकडील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे मातब्बर उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केला. या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी परिसरात एकच जल्लोष केला. संपूर्ण परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता.
माजी मुख्यमंत्री आणि मातब्बर नेते असलेल्या नारायण राणे यांना काँग्रेसने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. शिवसेनेने राणे यांच्याविरोधात दिवंगत माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. तर एमआयएमने रहेबर खान यांना येथून उमेदवारी दिली. उर्वरित अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरीदेखील खरी लढत ही शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम अशीच होती. त्यातही सेना विरुद्ध नारायण राणे असाही एक निवडणुकीचा टे्रंड पाहण्यास मिळाला. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्वमध्ये असणाऱ्या समाज मंदिर सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतरच शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या परिसरात दाखल होणे सुरु झाले. साहजिकच त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी आघाडी कायम ठेवल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रालगतच्या परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढतच होती. त्यामध्ये रिपाइंच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
सकाळी दहानंतर तृप्ती सावंत यांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांच्या फौजाच्या फौजा परिसरात दाखल होत होत्या. मातोश्रीपासून समाज मंदिर कल्याणपर्यंतचा परिसर भगवा झाला होता. भगवा हातात घेऊन दुचाकीहून हिंडणारे सेनेचे कार्यकर्ते बाळासाहेबांसह उद्धव यांच्या नावाचा जयघोष करत होते. आनंदोत्सव साजरा करणाऱ्या शिवसेना नेत्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले होते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या रणरागिणींनी मातोश्रीच्या अंगणात फुगडी घालून उत्साहात भर घालत होत्या. शिवसेनेच्या भगव्यासह रिपाइंचे निळे झेंडेही फडकत होते. शिवाय कार्यकर्त्यांनी केलेल्या आतषबाजीने वातावरणात उत्तरोत्तर रंगत आणली.
मतदारांनी बाळा सावंतांना जे सहकार्य केले तसेच सहकार्य आणि विश्वास माझ्यावर दाखवला, याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानते. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत मतदारसंघाच्या विकासाचे बाळा सावंत यांचे उर्वरित स्वप्न पुढील काळात पूर्ण करू. - तृप्ती सावंत
ते तुम्ही शिकवू
नका - राणे
वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवास सर्वस्वी आपण स्वत: जबाबदार असून काँग्रेसकडून आपल्याला पूर्ण साथ मिळाली, असा दावा करणाऱ्या नारायण राणे यांनी पुढे काय करायचे ते मी बघेन. मला कुणी शिकवण्याची गरज नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. ४५ वर्षांत नऊ निवडणुका लढलो. त्यामुळे पराभवाची जी चर्चा होत आहे ती आपल्याला नवी नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला असल्याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांची औकात काय, असा सवाल राणे यांनी केला. उमेदवारी व पदासाठी पैसे घेणाऱ्यांनी आपल्याला निष्ठेची व्याख्या शिकवू नये, असा टोलाही राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला.