सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:42 PM2023-08-18T13:42:05+5:302023-08-18T13:43:50+5:30
सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीत नोंदणी केली होती. मग रात्री असं काय झाले. बैठक घेऊन निवडणूक स्थगित करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई – राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भाजपात उडी मारली. नाहीतर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली असती. ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असती. मुख्यमंत्र्यांचा दबावामुळे निवडणूक स्थगित झाली का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत नाही. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका होत होत्या परंतु त्याही स्थगित केल्या. निवडणूक घ्यायला घाबरताय कशाला? २ पक्ष फोडले, १ कुटुंब फोडले, महाशक्ती स्थापन केली. इतके करुनही मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तुम्ही घ्यायला घाबरत असाल तर काय उपयोग आहे? असा घणाघात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटावर केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, १७ ऑगस्टला रात्री उशीरा मुंबई विद्यापीठाने पत्रक काढून पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणूक पुढे ढकलली. २०१० मध्ये युवासेनेने १० पैकी ८ जागा जिंकल्या, २०१७ मध्ये १० पैकी १० जागा जिंकल्या. हा निकाल १०० टक्के होता. या निवडणुकीत सगळेच पक्ष होते. आता सिनेट निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आमच्यासह इतर संघटनांनी ही निवडणूक लढवायची हे ठरवलं. मग ही निवडणूक अचानक रद्द का केली कुणालाही कळाले नाही. मणिपूर, पश्चिम बंगाल यासारखे वातावरण इथं नाही. कुठेही हिंसाचार न होता निवडणूक लढली जाते. सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीत नोंदणी केली होती. मग रात्री असं काय झाले. बैठक घेऊन निवडणूक स्थगित करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत ही बैठक कुठे झाली? किती वाजता झाली?, बैठकीत कोण कोण उपस्थित होते? बैठक कुणाच्या घरी झाली? बैठकीचे मिनिट्स कुठे आहेत? हे कुणालाच माहिती नाही. शासन पत्राचा उल्लेख केला मग हे पत्र कुठे आहे? निवडणूक स्थगित झाल्यानंतर आता ही निवडणूक कधी होणार? सव्वा लाख मतदारांनी निवडणुकीसाठी नोंदणी केली. मतदारांनी छाननी केली. ९५ हजार पात्र मतदार ठरले. मग हे सर्व झाल्यानंतर नक्की काय घडलं ज्यामुळे निवडणूक स्थगित केली? असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार श्री. आदित्य ठाकरे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद@AUThackeraypic.twitter.com/dJVwDe2rtR
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 18, 2023
दरम्यान, कदाचित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि तो रद्द करून आम्हीच नेमणुका करू आणि देश चालवू असं होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासक चालवत असून त्यात घोटाळे करतायेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, मग पदवीधरांची काय चूक त्यांचा आवाज सिनेटमध्ये जाऊ शकत नाही? सिनेटनं सरकार पडणार नाही, ते आम्ही पाडणार आहोत. लोकशाही संपवण्याचं काम डोळ्यादेखत होत आहे असा आरोपही आदित्य यांनी केला.