ऐन गणेशोत्सवात सिनेट निवडणुका
By admin | Published: July 2, 2017 06:42 AM2017-07-02T06:42:44+5:302017-07-02T06:42:44+5:30
विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर, आता तब्बल २३ वर्षांनी मुंबई विद्यापीठात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विद्यार्थी संघटनांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर, आता तब्बल २३ वर्षांनी मुंबई विद्यापीठात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत सिनेटची प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने तसेच गणेशोत्सवादरम्यान निवडणुका येत असल्याने विद्यार्थी संघटना आणि नेते चिंतित आहेत.
सिनेट निवडणुकांचे अंदाज वेळापत्रक जाहीर झाल्यावर, विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. या वेळी निवडणुकांच्या प्रक्रियेत बदल करा, वेळ वाढवून द्या, अशा मागणीने जोर धरला होता, पण सिनेट ३१ आॅगस्टपर्यंत बसली पाहिजे. त्यामुळे वाढीव वेळ देणे शक्य नसल्याचे शिक्षणमंत्री आणि विद्यापीठाकडूनही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता मोर्चेबांधणी कशी करायची आणि मतदानाचा टक्का कसा वाढेल, यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
२५ आॅगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी गणेशोत्सवादरम्यान गावी जातात. त्यामुळे नावनोंदणी असली, तरी मतदानाला किती जण हजेरी लावतील, याविषयी चर्चा रंगत आहेत. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांची हजेरी कमी होते. त्याच कालावधीत निवडणुका ठेवल्यास, आपल्या नेत्याला निवडून आणण्याचे आव्हान विद्यार्थी संघटनांसमोर असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी नावनोंदणी संपल्यावर, तत्काळ विद्यार्थी संघटनांच्या बैठका सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मतदारांच्या नोंदणीवरही भर
गणेशोत्सवाच्या काळात निवडणुका आल्या, तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नावनोंदणी करण्यावरही विद्यार्थ्यांनी भर दिल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सिनेट निवडणुकांसाठी नावनोंदणी करण्यास अवघा एकच महिना विद्यार्थी संघटनांना मिळाला होता. त्यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. तरीही संघटनांनी सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली आहे.
जास्त प्रमाणात नोंदणी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी अधिक अर्ज आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. युवा सेनेतर्फे
३५ हजार, मनविसेतर्फे ७ हजार, अभाविपतर्फे ५ हजार आणि अन्य संघटनांनी
१० अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत अधिकृत आकडेवारी जाहीर होईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.