Join us

सिनेट निवडणूक: मतदार यादीतून नाव वगळल्याने शिक्षक संतप्त; यादीत सुधारणेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 7:45 AM

याबाबत आझाद मैदानात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या शिक्षक, विभागप्रमुखांची नावे सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून ५९७ शिक्षकांची, तर ६८३ विभागप्रमुखांपैकी २९४ जणांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. त्यामुळे त्वरित या मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन (बिदाता) संघटनेने केली आहे. याबाबत आझाद मैदानात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले.

मुंबई विद्यापीठांतर्गत विविध विभागांचे ३० टक्के विभागप्रमुख आणि इतर सुमारे २० टक्क्यांहून अधिक शिक्षकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे हे शिक्षक विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आझाद मैदान येथे करण्यात आलेल्या आंदोलनात  संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश शेंद्रे, उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, डॉ. भटू वाघ, डॉ. महेंद्र दहीवले, डॉ. सुनील दहीवले यांच्यासह शिक्षक, विभागप्रमुखांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.  

मुंबई विद्यापीठाने नुकताच पदवीधर वगळून प्राचार्य, संस्थाचालकांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि व्यवस्थापन परिषदेच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी ७ जूनपासून मतदारसंघातील उमेदवारांना अर्ज करता येतील, तर या उमेदवारांची यादी १९ जूनपर्यंत जाहीर होणार आहे.

 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ